गुरूकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमधील ‘महिलोन्नती’ हा अध्याय विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातील महिलांना संस्काराचे बोधामृत देणारा असून ‘महिलोन्नती’ ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित महिला संमेलनात संमेलनाध्यक्ष पुष्पा बोंडे यांनी केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जगाच्या पाठीवर राष्ट्रसंतांचे व्यासपीठ खऱ्या अर्थाने माणूस घडविणारे व्यासपीठ आहे. राष्ट्रसंतांचा विचार अंत:करणात पोहोचवून आचरणात आणायचा असेल तर त्यांच्या प्रत्येक ओळीचे वाचन महिलांनी करायला हवे. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी कल्याणी पद्मने, स्मिता वानखेडे, पौर्णिमा सवई, छाया दंडाळे, सुधा जवंजाळ, भागिरथी गजबे यांच्यासह अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, दामोदर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला संजना राजेंद्र देशमुख हिने ‘ईश स्तुती कथ्थक नृत्य’ दिमाखदारपणे सादर करून आपली सेवा श्रीगुरुदेव चरणी अर्पण केली.
राष्ट्रसंतांचे साहित्य हे संस्कारांचे बोधामृत
By admin | Published: October 11, 2014 10:56 PM