पान २ ची लिड
नरेंद्र निकम
मोर्शी : दिवसेंदिवस शेती करणे जिकरीचे काम होत आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद व मूग पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांची सर्व मदार आता तूर व कपाशीवर असताना कापूस वेचणीचे दर वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कापसाचा दर ५० रुपये अन् तो वेचण्यासाठी २० रुपये प्रतिकिलो खर्च करायचे, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. वेचणीसाठी २० रुपये प्रतिकिलो मजुरी द्यायची तयारी असतानाही मजूर मिळत नसल्याने उणापुरा कापूस घरी आणायचा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
मजुरी चुकविण्यासाठी शेतकऱ्यांना कापसाची किरकोळ विक्री करावी लागत आहे. भाव ५० ते ५४ रुपये किलो असताना, वेचणी सोडून हाती केवळ ३० रुपये येतात. बोंडअळी व बोंडसडीमुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. कापसाचे उत्पादन अर्ध्यावरच आले आहे. तालुक्यात बागायती शेती वाढत असल्याने मजुरांची टंचाई अधिक जाणवू लागली आहे. परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागणार नाही. मजुरी चुकविण्यासाठी चिल्लर विकलेल्या कापसाचे पैसे साठवले जात नाही. त्यामुळे भविष्याचे काय, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कापूस वेचणाऱ्या मजूर स्त्रीला २०० रुपये मजुरी असून, ती दिवसाला १० ते १२ किलो कापूस वेचते. बहुतांश शेतकऱ्यांना उत्पादन खर्च पण निघणार नाही, हे कळून चुकले आहे.
पूर्वी पाथीवर मजुर असायचे, मात्र आता एक-एक करून मजूर गोळा करावा लागतो. त्यातही बड्या शेतकऱ्यांकडे अधिक दिवस काम मिळेल, मजुरी मिळेल, या आशेपोटी मजूर वर्ग तिकडे धाव घेतो. त्यामुळे चार-दोन एकर कपाशी असलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब मजूरच झाले आहेत. २० रुपये किलोची कापूस वेचाई देणे परवडत नसल्याने घरच्या घरी कापूस वेचण्यावर भर दिला जात आहे.
खासगी व्यापारी बरा
कापसाचा शासकीय हमीभाव ५७०० रुपये आहे. खासगी बाजारात ५००० ते ५४०० रुपयांनी कापूस खरेदी केला जात आहे. नाफेडला कापूस द्यायचा असल्यास खरेदी केद्रांपर्यंत कापूस पोहचविण्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये खर्च येतो. अर्थात खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती ५४०० रुपये पडतात. व्यापारी १५ ते २० दिवसांनी चुकारा करतात, तर नाफेड त्याच चुकाऱ्याला एक ते दोन महिन्यांचा कालावधी घेतला जातो. त्यामुळे ऑन दि स्पॉट विक्रीला शेतकरी पसंती देत आहेत.
मजुरीसाठी विकावा लागतो कापूस
कापूस वेचणीची मजुरी दररोज व रोख स्वरूपात द्यावी लागते. हातमजुरीवर चरितार्थ असल्याने कुणीही मजुरी थांबवून ठेवत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना घरी येईल तसा कापूस विकावा लागतो. कापूस पाच क्विंटल मोजून द्यायचा अन् पैसे दोन क्विंटलचे तरी रोख द्या, अशी विनवणी व्यापाऱ्यांना करायची, ही ग्रामीण भागातील वस्तुस्थिती आहे.
कोट
सध्या खुल्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ४८०० ते ५२०० रुपये दर मिळत आहे. तत्पूर्वी, कापूस वेचाईसाठी २० रुपये किलो खर्च आला. शेतकऱ्यांचे सारे गणितच कोलमडले आहे.
- मोरेश्वर पापडकर, तळणी, शेतकरी