गल्लोगल्ली फिरून ग्रामीण भागातून खरेदी करतात तांदूळ
वरूड/अमरावती : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदाराकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता लाभार्थीच तीन रुपये किलोचा तांदूळ १० ते १५ रुपये प्रतिकिलोने खुल्या बाजारात विकत आहेत. व्यापाऱ्यांचे दलाल गल्लोगल्ली फिरून रेशनचा तांदूळ खरेदी करीत आहेत. जिल्हाभरातून दररोज शेकडो क्विंटल तांदूळ अशाप्रकारे जमा केला जातो. महसूल प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.
गोरगरिबांनी नेलेला महिनावारी तांदूळ, गहू खुल्या बाजारात खरेदी करणारे रॅकेट सक्रिय असून ग्रामीणसह शहरी भागातूनसुद्धा केवळ १० ते १५ रुपये दराने तांदूळ खरेदी करणारे दलाल गल्लोगल्ली भटकंती करून १५ रुपये भावाने तांदूळ खरेदी करतात. भंगारवाल्यासारखे गावागावात जाऊन शेकडो क्विंटल तांदूळ व्यापाऱ्यांच्या घशात घातला जात असल्याची ओरड वरूड तालुक्यात आहे. एका दिवसाला १० ते १५ क्विंटल तांदूळ खरेदी करून व्यापाऱ्याला विकला जातो. व्यापारी या फिरस्त्या दलालांकडून घेतलेला तांदूळ ट्रकमधून भंडारा गोंदियाकडे रवाना करतो. फिल्टर करून तोच तांदूळ एक तर शासनाला किंवा खुल्या बाजारात ३० ते ३५ रुपये किलो दराने विकून शासनाच्या योजनेला हरताळ फासण्याचा प्रकार सुरू आहे.
बॉक्स
तीन रुपये किलो तांदूळ
कोरोनाकाळात केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली. यामध्ये प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत देण्यात येते. यात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे सूत्र आहे, तर अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गतसुद्धा धान्यवाटप केले जाते.
बॉक्स
हे घ्या पुरावे
भातकुली
सरकारकडून तांदूळ भरपूर मिळत आहे. ते आपले अन्नच नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी गहू मिळविण्यासाठी तांदूळ विकत असल्याचे एका व्यक्तीने सांगितले.
बॉक्स
वरूड
तांदळाचा साठा करून तो जिल्ह्याबाहेर विकण्याचा प्रकार वारंवार उघडकीस येतो. अलीकडेच मोठा तांदूळ साठा पकडला गेला आहे.
कोट
केंद्र व राज्य शासनाकङून गरजू लाभार्थींना रेशन दुकानदारांमार्फत धान्य पुरवठा केला जातो. अशा प्रकारच्या धान्यविक्रीबाबत पुरवठा विभागाकडे कुणाचीही तक्रार नाही. तक्रार आल्यास चौकशी व कारवाई करू.
- अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी