अमरावती : रेशनवर स्वस्त आणि मोफत वस्तू देण्याच्या घोषणा दिवसेंदिवस वाढत आहेत. या साहित्याच्या वितरणाची जबाबदारी असलेल्या रेशन दुकानदारांची यामुळे कोंडी होत आहे. तुटपुंजे कमिशन, ‘पीओएस’ मशिनमध्ये सतत होणारा बिघाड, सुविधांचा अभाव यामुळे त्रस्त झालेल्या रेशन दुकानदारांनी १ जानेवारीपासून ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर्स फेडरेशन यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक वेलफेअर संघाने बेमुदत संप पुकारला. या आंदोलनामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात रेशनवरील वस्तू लाभार्थ्यांना मिळणे कठीण झाले आहे.
देशात सर्वसामान्य जनतेला रेशनवर स्वस्त धान्य वितरित केले जाते. याचा लाभ लाखाेंपेक्षा अधिक जनतेला होतो. निवडणुकीच्या काळात अशा दुकानांतून अधिकाधिक वस्तू देण्याची घोषणा होते. मात्र, वितरकांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पूर्वी या वितरकांना चांगले कमिशन हाेते. आता मात्र विक्री ऑनलाइन झाल्याने त्यावर मर्यादा आल्या आहेत. ‘फाइव्ह जी’च्या जमान्यात ‘टू जी’ची यंत्रणा असलेल्या पॉश मशिन दिल्या आहेत. ‘एक देश, एक रेशन’ उपक्रमासाठी सुविधांचा अभाव आहे. तुटपुंजे कमिशन, इतर वस्तू विक्रीसाठी नसलेली परवानगी, वाढत असलेले लाभार्थी, अन्न सुरक्षा व मोफत धान्य वाटप, ‘आनंदाचा शिधा’सारख्या नवनवीन योजना वाढत असल्या, तरी दुकानदारांच्या पदरात फारसे काही पडत नसल्याने ते अस्वस्थ आहेत. सरकारकडे मागण्यांची दखल न घेतल्याने रेशन दुकानदारांनी अखेर देशव्यापी विक्री बंदचे हत्यार उपसले आहे. १ जानेवारीपासून जिल्हाभरातील यामुळे १९१४ दुकानांना टाळे लागले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याची माहिती प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उल्हे पाटील यांनी दिली. दृष्टिक्षेपातदुकाने : १९१४एकूण कार्डधारक : ६ लाख १६ हजार ९१लाभार्थी : २४ लाख ४८ हजार ५२१मिळणारे कमिशन : १०० किलो विक्रीला १५० रुपये