फळांचा राजा महागडा, बैगनपल्ली, लालबाग, केसर, गुलाबखस आंबा बाजारपेठत दाखल
अमरावती : हापूस फळांचा राजा ही ओळख सर्वदूर कायम आहे. मात्र, यंदा बाजारपेठेत रत्नागिरीचा हापूस दाखल झाला असला तरी तो अतिशय महागडा असल्याने सर्वसामान्यांना त्याची चव मिळणे कठीण असल्याचे वास्तव आहे. हापूस आंबा दर प्रति डझन ८०० ते ११०० रुपये दराने विकला जात आहे.
उन्हाळा सुरू होताच आंबे विक्रीसाठी येतात. यंदा कोरोनामुळे आंबे बाजारपेठेत कमी प्रमाणात येत असल्याची माहिती आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मंडईत आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात व पश्चिम महाराष्ट्रातून विविध जातीचे आंबे विक्रीसाठी आले आहेत. हल्ली फळांच्या बाजारपेठेत रत्नागिरीचा हापूस लक्ष वेधून घेत आहे. हापूस आंबा दर्जानुसार ८०० ते ११०० रुपयांपर्यंत प्रतिडझन दराने विकला जात आहे. तसेच बैगनपल्ली १६०, लालबाग १६०, गुलाबखस २००, तर केसर २५० रूपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. कोरोना संसर्गाचा परिणाम वाहतुकीवर होत असून, आंबे अल्प प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्यात आंब्याची आवक वाढणार असल्याचे संकेत अमर फ्रुट भंडारचे संचालक राजा मोटवाणी म्हणाले.
---------------
परदेशात हापूसची मागणी घटली
कोरोना संसर्गामुळे परदेशात हापूस आंब्याची असलेली मागणी यंदा घटली आहे. अशातच विमानसेवेचाही परिणामी हापूस आंब्याच्या निर्यातीवर झाला आहे. हापूस आंबा उत्पादकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आखाती, पाश्चिमात्य देशात यंदा हापूसची मागणी नोंदविण्यात आली नाही, अशी माहिती एका थोक विक्रेत्याने दिली.