गुरुवारी निघाला तोडगा : १५ दिवसांचा अवधी अमरावती : पगारवाढीमध्ये भेदभाव करून प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या रतन इंडिया कपंनीच्या धोरणाविरोधात अडीचशे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेला बंद गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मागे घेण्यात आला. रतन इंडियाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंग आणि हिमांशू माथूर यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांची गुरुवारी बैठक पार पडली. त्यात १५ दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. गुरुवारी रतन इंडियामध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक कामगारांनी अमरावती येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर रतन इंडियाचे व्यवस्थापन हादरले व त्यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत मध्यम मार्ग निवडण्यात आला. परप्रांतीयांविरुद्ध प्रकल्पग्रस्त असा सामना सध्या रतन इंडियात रंगला आहे. काम सारखेच मात्र दाम वेगवेगळे असून परप्रांतीयांना पगारवाढ तर प्रकल्पग्रस्तांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. द्वेषभावनेतून वारंवार प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असून या अन्यायाविरोधात १३० प्रकल्पग्रस्त व इतर स्थानिक कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.मार्च महिन्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्यात आली. मात्र प्रकल्पग्रस्त व इतर स्थानिक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ न केल्याने कर्मचाऱ्यांनी कर्नल लोकेशसिंग यांची भेट घेतली होती. मात्र त्यांनी सकारात्मक उत्तर न दिल्याने नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. कर्मचाऱ्यांनी बंदची घोषणा करताच रतन इंडियाच्या अधिकाऱ्यांनी कामगार अधिकारी जाधव यांनादेखील पाचारण करण्यात आले व मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कामगार अधिकारी यांनी येथे का बोलावले म्हणून कर्मचाऱ्यांशी वाद घातला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशाची अवहेलना करण्याचा प्रकार रतन इंडियाने केला, असा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी केला. नियमाप्रमाणे पगारवाढ व्हावी, प्रकल्पग्रस्तांना मिळणारी सापत्न वागणूक टाळावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांची असून १५ दिवसांच्या आत यावर तोडगा न निघाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रफुल्ल तायडे, सचिन चेंडकापुरे, विनोद पांडे, देवानंद इंगोले, राजेश बारबुद्धे, अमोल इंगळे, राहुल नाकाडे, गोफणे यांच्यासह अडीचशे कर्मचाऱ्यांनी रतन इंडियाला दिला आहे. (प्रतिनिधी)
रतन इंडियातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे
By admin | Published: April 08, 2016 12:10 AM