अमरावती: एका ३३ वर्षीय महिलेला चाकूच्या धाकावर ओलीस ठेवत, तिचे हातपाय बांधून सोन्याचे दागिने व रोख व मोबाईल असा एकूण ३ लाख ८५ हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. २९ मे रोजी रात्री घडलेल्या त्या जबरी चोरीप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली असून, त्यांंच्याकडून ९.४२ लाख रुपये किमतीचे १८६ ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले आहे. आरोपी ओळखीतीलच असावा, असा अंदाज राजापेठ डीसीपींनी वर्तविला होता. तो अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, रवी इंगोले नामक ओळखीतील व जवळच्या कॉलनीत राहणाऱ्या तरूणानेच त्या महिलेच्या घरी चोरी करण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे.
अटक आरोपींमध्ये रवी सुखदेवराव इंगोले (२२, रा. गणपती अपार्टमेंट, गणपती नगर, अमरावती) व शुध्दोधन मारोती भोसले (३६, दत्ताळा, मुर्तिजापुर, जि. अकोला) यांचा समावेश आहे. गुन्हयातील तिसरा आरोपी आकाश समदुरे (रा. धामणगाव फैल, मुर्तिजापूर) हा फरार असून त्याला शोधण्याकरीता पोलीस पथक रवाना झाले आहे. एमआयडीसी मार्गावरील मेहेरबाबा आश्रम परिसरातील बोंडे ले-आउटजवळील बीएसटी कॉलनी येथील रहिवासी रेश्मा राकेश पाबारी (३३) या घरी एकट्या होत्या. बुधवारी रात्री दोन अज्ञातांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी चाकूच्या धाकावर रेश्मा यांचे हातपाय बांधले. लुटारूंनी अलमारीतील ६१.५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख ६० हजार रुपये असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लुटला. राजापेठ पोलिसांनी यात ६१.५ ग्रॅम सोने चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवून घेतली होती. मात्र, आपल्या घरातून सुमारे २०० ग्रॅम सोने चोरून नेल्याचे महिलेने म्हटले होते. आरोपींकडून १८६ ग्रॅम सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले.
नेमके घडले काय?२९ मे रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास रेश्मा या घरी एकट्याच असताना अज्ञात दोघांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. दार उघडताच घर विक्री आहे काय, असे त्यांनी विचारले. त्यावर रेश्मा यांनी घर विक्रीला नसल्याचे सांगितले. दोघांपैकी एकाने पाणी मागितल्याने त्या आत जात असताना एकाने त्यांच्या गळ्यावर चाकू लावला. तर दुस-याने फिर्यादीचे हात पाय बांधून घरातील सोने व रक्कम चाकुच्या धाकावर लूटून नेली होती.
९.४२ लाख रुपयांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक करण्यात आली. जबरी चोरीचा ४८ तासाच्या आत यशस्वी उलगडा करण्यात आला. आरोपींना न्यायालयाने ६ मेपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली आहे. गुन्हयामध्ये इतरही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त
यांनी केली कारवाईपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, एसीपी जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार महेंद्र आंभोरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र राजुरवार, उपनिरिक्षक मिलिंद हिवरे, हेकॉ मनीष करपे, अंमलदार रवी लिखितकर, पंकज खटे, गणराज राऊत, विजय राऊत व सागर भजगवरे यांनी ही कारवाई केली.