अमरावती - जनतेने महायुती सत्तेत असावी, असाच कौल दिला असताना राज्यात सत्ता स्थापनेवरून धूमशान सुरू आहे. मुख्यमंत्री कोण? यावरून भाजप-सेनेत तिढा कायम असताना दुसरीकडे संख्याबळ वाढीचा प्रयत्न दोन्ही बाजुने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी १४ अपक्ष आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.मुख्यमंत्री फडणवीस यांना १४ अपक्ष आमदारांनी जाहीर पाठींबा देण्यासाठी बडनेरा मतदार संघाचे आ. रवि राणा यांनी मोठी भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणाºया अपक्ष आमदारांमध्ये रवि राणा यांच्यासह राजेश पाटील, क्षितीज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, विनय कोरे, श्यामसुंदर शिंदे, विनोद अग्रवाल, किशोर जोगरेवार, महेश बालडी, संजयमामा शिंदे, राजेंद्र राऊत, प्रकाश अण्णा आवाडे, राजेंद्र श्यामगोंडा पाटील, गीता जैन यांचा समावेश आहे.
पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ आणि पारदर्शकपणे राज्याचा कारभार सांभाळला. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्रीपदी फडणवीस हेच असावे. त्यांच्या हातून लोकाभिमूख निर्णय होऊन सर्वसामान्यांची कामे पूर्णत्वास जावे, अशी अपक्ष आमदारांची भावना आहे. - रवी राणा, आमदार, बडनेरा मतदारसंघ