जितेंद्र दखणे
मेळघाट (अमरावती) : चार वर्षांमध्ये मेळघाटात काॅलराची पुन्हा साथ पसरली असून, यात चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी येथील चौघांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने ७ जुलैला या मृत्यूची नोंद घेतली. या साथरोगाने पाचडोंगरी, कोयलारी व लगतच्या परिसरात गंभीर वळण घेतले आहे. तेथील आरोग्यविषयक स्थिती स्फोटक बनली आहे.
कॉलरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाचडोंगरी येथील गंगाराम नंदराम धिकार (वय २५), सविता सहदेव अखंडे (२७), सुखलाल मोती जामूनकर (७६), तर कोयलारी येथील मनिया रंगीसा उईके (७५) यांचा समावेश आहे. कॉलराने डोके वर काढल्यानंतर काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
गंभीर वळण घेतलेल्या रुग्णांना चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल केले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोयलारी व पाचडोंगरी येथील प्राथमिक शाळेतही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पाचडोंगरी, कोयलारीनंतर घाना या गावातही लागण झाली. तेथील रुग्णांवर काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. पाचडोंगरी आणि कोयलारी ही गावे या साथरोगाने ८५ टक्के बाधित झाली आहेत.
पर्यायी व्यवस्था
चुरणी येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र,वाढती रुग्णसंख्या बघता तेथील आदिवासी भवनात ३० बेडचे तात्पुरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. स्वतः जिल्हा शल्य चिकित्सकांनी या पर्यायी व्यवस्थेकडे लक्ष पुरविले आहे. पाचडोंगरी आणि कोयलारी येथील वाढती रुग्णसंख्या आणि कॉलराचे उग्र रूप बघता मेळघाटातील अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा या ठिकाणी अधिग्रहित करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद नरवने या परिसरात स्वतः जातीने हजर राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांची शासकीय वाहनेही आवश्यक औषधींनी खचाखच भरली आहेत. वेळप्रसंगी तेही रुग्णांच्या उपचारार्थ पुढे सरसावत आहेत.
पाचडोंगरी, कोयलारी व लगतच्या परिसरातील रुग्णांची संख्या ४०० च्या जवळपास आहे. कॉलराने मृत्यू होण्याची चार वर्षांत मेळघाटातील ही पहिलीच घटना आहे. गावागावांत सर्वेक्षण सुरू असून, साथ आटोक्यात येत आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती