धार्मिक भावनेचा आदर : नेरपिंगळाई येथील घटनानेरपिंगळाई : नवरात्रोत्सवानंतर दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर १५ दिवसांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती भग्नावस्थेत दिसून आल्या. त्यामुळे त्यांची होत असलेली विटंबना बघता ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर ग्रामपंचायतीने दखल घेऊन अखेर शुक्रवारी भग्न मूर्तींचे पुन्हा विसर्जन केले.उत्सवादरम्यान मूर्तीची प्रतिष्ठापना करून ९-१० दिवस भक्तिभावाने पूजाअर्चा करून शेवटी मोठ्या उत्साहात गाजावाजा करून त्यांचे विसर्जन केले. परंतु मूर्तींचे खरेच विसर्जन झाले की नाही हे बघण्याची कुणीही तसदी घेतली नाही. १५ दिवसांनंतर विसर्जनस्थळी पाण्याची पातळी कमी झाल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तशाच तुटफूट भग्नावस्थेत आढळून आल्याने मूर्त्यांची डोळ्यांदेखत विटंबना होत असल्याचे पाहून गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे काही गावकऱ्यांनी यासंदर्भात ‘लोकमत’कडे दु:ख व्यक्त केले. या प्रकरणाची दखल घेऊन ५ नोव्हेंबर रोजी 'लोकमत'ने ‘विसर्जित मूर्तीची विटंबना थांबवा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून ग्रामपंचायतीला सदर मूर्तींचे सन्मानाने पुन्हा विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने विसर्जन स्थळावरील भग्न मूर्ती व त्यांचे अवशेष गोळा करून गावानजीकच्या पाझर तलावांमध्ये पूजाअर्चा करून पुन्हा विसर्जन केले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी यानंतर नागरिकांच्या भावनांना धक्का पोहोचणार नाही याकरिता संबंधित मंडळांनी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने जागरूक राहावे, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)
विसर्जित भग्न मूर्तींचे पुन्हा विसर्जन
By admin | Published: November 22, 2015 12:09 AM