फोटो - जावरे २२ पी
(पीओपी मूर्तींचे पुन्हा विसर्जन करताना सामाजिक संघटनांचे पदाधिकारी)
परतवाडा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मातीच्या गणेशमूर्ती विकत आणण्याचे नागरिकांना विविध स्तरांवरून करण्यात आलेले आवाहन फोल ठरले आहे. त्याचा प्रत्यय सापन नदीत न बुडालेल्या गणेशमूर्तींवरून येत आहे. अशा हजारो मूर्ती पूजाअर्चा करून बुधवारी कृत्रिम जलाशयात पुन्हा विसर्जन करण्यात आल्या. मूर्तीद्वारे अविघटनशील पीओपी पाण्यात मिसळत असल्याने जलप्रदूषणाची पातळी वाढण्याची भीती कायम आहे.
आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, कुंभार समाज, सावळी दातुरा ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते यांनी हा महत्त्वपूर्ण उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविला. चार दिवसांपासून सापन नदीत गणेश विसर्जन होत आहे. परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नदीत गणेशमूर्ती विसर्जन केल्या. बुधवारी सापन नदीपात्राचे पाणी ओसरल्यानंतर उघड्या पडलेल्या पीओपीच्या हजारो मूर्त्या पाच ते सहा ट्रॅक्टरमध्ये गोळा करण्यात आल्या. त्यांचे विधिवत पूजन केल्यानंतर कृत्रिम तळ्यात विसर्जन करण्यात आले.
बॉक्स
पीओपीच्या मूर्तींवर सर्वाधिक भर
नागरिक मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्ती खरेदी करत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले. पर्यावरणाला धोका असणाऱ्या मूर्ती टाळा व मातीच्या मूर्ती स्वीकारा, हा सामाजिक संदेश देत आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, कुंभार समाज, सावळी ग्रामपंचायततर्फे दरवर्षी दिला जातो. पीओपी मूर्तींचे पूर्वीपेक्षा प्रमाण कमी असले तरी मातीच्या मूर्तींचा खप कमीच असल्याचे यंदा पुन्हा उघडकीस आले आहे.
बॉक्स
संघटना, पदाधिकारी, प्रशासन सोबत
जुळ्या शहरातील विविध संघटना, प्रशासन व पदाधिकारी नेहमीप्रमाणे या कार्यासाठी सोबत आले. सरपंच मनोहर बहुराशी, सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे, ठाणेदार सदानंद मानकर, गणेश बेलोकार, सुनील खानजोडे, आदिवासी पर्यावरण संघटनचे योगेश खानजोडे, संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापती, नवीन प्रजापती, मुरलीधर ठाकरे, कुंभार समाज प्रतिनिधी राजेश प्रजापती, मनोज प्रजापती, रमेश प्रजापती, रोहन प्रजापती, सूरज, शुभम, पंकज, दिनेश प्रजापती, सूरज पेंटर, प्रकाश प्रजापती, अनिल बर्डे, बाबू धोटे, राजा पानसे, संजू उईके, आनंद मनोहरे, दिलीप मनोहरे या युवकांनी श्रमदान करून सापन नदीपात्र स्वछ केले.