फोटो पी २० गडलिंग
सूरज दहाट - तिवसा : जेमतेम परिस्थिती आणि हातावर पोट असतानाही वडिलांनी कंबर कसली आणि मुलाने त्यांच्या कष्टाचे चीज करीत नायब तहसीलदारपद मिळविले. मात्र, त्याला वर्षभरापासून सरकारने नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे आता मनरेगाचे काम तरी द्या, अशी मागणी ............. येथील अक्षयसह गडलिंग कुटुंबाने शासनाकडे केली आहे.
अक्षय गडलिंग यांनी भंगार गोळा करीत मुलांना घडविले, शिकविले. यशाचा मार्ग शिक्षणातून जातो, हे त्यांच्यावर बिंबवले. त्यामुळे योग्य शिक्षण घेऊन वर्षभरापूर्वी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करीत अक्षयने नायब तहसीलदारपद मिळविले. मात्र, तब्बल एक वर्ष उलटूनही शासनाने सेवेत सामावून घेतले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा २०१९ मध्ये ४१३ पदांकरिता घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल १९ जून २०२० रोजी लागला. वर्ष झाले तरी उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार व नायब तहसीलदार अशा महत्त्वाच्या पदांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकार उदासीन आहे.
-----------------
राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर समाजाने डोक्यावर घेतले. आता तोच समाज प्रश्न विचारतोय, केव्हा नियुक्ती मिळणार? आम्ही प्रचंड मेहनत घेऊन पाच ते सहा वर्षे अभ्यास करून सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहिले. सरकारने यातून मार्ग काढावा. नियुक्ती द्यावी, अन्यथा मनरेगाचे काम तरी द्यावे.
- अक्षय गडलिंग, तिवसा