प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला रंगले प्रेमनाट्यबडनेरा : त्याने दीड वर्ष तिच्याशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाचे आश्वासन दिले. प्रेम बहरत गेले. त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या ‘ती’ने त्याच्यावर विश्वास टाकून सर्वस्व बहाल केले. पण, त्याने तिला अंधारात ठेवून दुसरीशीच विवाह केला. या जबर धक्क्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, सुदैवाने ती वाचली आणि तिच्या बयाणाच्या आधारे नवरी घेऊन घरी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या धुंदीत सगळी तरूणाई मग्न असताना १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली. सिध्दार्थ पांडुरंग लांडगे (२९, रा.पाचबंगला, बडनेरा) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. विस्तृत माहितीनुसार सिध्दार्थ हा रेल्वेमध्ये चालक म्हणून कार्यरत आहे. त्याचा विवाह १४ फेब्रुवारीला परभणी येथील तरूणीशी होणार होता. त्यामुळे लग्न वऱ्हाड परभणीला गेले होते. ‘प्रेम दिनी’ हा विवाह सोहळा होणार असल्याने सगळेच आनंदात होते. थाटामाटात लग्न लागले आणि नवपरिणित वधूला घेऊन सिध्दार्थ बडनेरात परत आला. मात्र, येथे पोलीस आधीच त्याच्या प्रतीक्षेत होते. स्थानिक गांधी विद्यालयाजवळ त्याचे वाहन येताच पोलिसांनी सिध्दार्थला अटक केली. त्याच्या प्रेयसीने पोलिसांना दिलेल्या बयाणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेणाऱ्या तरूणीच्या बयाणानुसार तिचे आणि सिध्दार्थचे मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तोे तिच्याशी लग्न देखील करणार होता. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंधही प्रस्थापित केले होते. मात्र, त्याचा विवाह १४ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती मिळाली आणि मानसिक धक्का बसलेल्या त्या तरूणीने उंदिर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच उपचार मिळाल्याने ती वाचली. शुध्दीत आल्यानंतर तिने पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी या बयाणाच्या आधारे सिध्दार्थ लांडगेविरूध्द भादंविच्या कलम ३७६ /२/एन नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहत्रे, पीएसआय प्राजक्ता धावडे, मोहन चोखट यांनी केली. इकबाल चव्हाण यांच्या डीबीने अटक करण्याची कारवाई केली. (प्रतिनिधी)
वरात घरी पोहोचण्यापूर्वीच नवरदेव चतुर्भुज
By admin | Published: February 16, 2016 12:09 AM