अमरावती - अमरावती मध्यवर्ती कारागृहात वाचन संस्कृतीचा बहरली. आयुष्यात घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेणाऱ्या कैद्यांकरिता कारागृहात स्वतंत्र वाचनालय असून, येथे २५०० ग्रंथांची संपदा आहे. थोर समाजसुधारक, राष्ट्रनिर्माते, संत-महात्म्यांच्या जीवनचरित्र वाचनाला कैद्यांकडून पसंती दिली जाते, हे विशेष.
कारागृहात सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत कैद्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम तसेच प्रौढ साक्षरता अभियान आहेतच, कारागृह प्रशासनाने वाचनसंस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी, यासाठी सुसज्ज ग्रंथालय उभारले आहे. या ग्रंथालयात वर्तमानपत्रे, विविध मासिके, पाक्षिके, साप्ताहिकांसह मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेतील ग्रंथ उपलब्ध आहेत. कैद्यांच्या मागणीनुसार ही पुस्तके त्यांना पुरविली जातात. दरदिवशी २५ ते ३० ग्रंथ वाचनासाठी मागितले जात असल्याच्या नोंदी आहेत. वाचनालयाच्या दर्शनी भागात भारतीय राज्यघटनचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘वाचेल तो वाचेल’ हे ब्रीद कैद्यांना वाचनसंस्कृतीकडे आपसूकच नेत आहे.
निरक्षर बंदीजन होताहेत साक्षर
कारागृहात निरक्षर कैद्यांची संख्या मोठी आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर समाजात ते साक्षर वावरले पाहिजे, या कारागृह प्रशासनाच्या तळमळीतून शासनाच्या प्रौढ साक्षरता अभियान अंतर्गत विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम निरंतर सुरू आहे. सध्या १५ कैद्यांची तुकडी साक्षरतेकडे वाटचाल करीत आहे.
कैदी वाचनालयातील हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू भाषेतील पुस्तके कामे आटोपल्यानंतर वाचतात. दरदिवशी २५ ते ३० पुस्तकांचे आदान-प्रदान होते. वाचनालयात कैद्यांचे अभिप्रायसुद्धा नोंदविले जातात.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती