चांदूर रेल्वे : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणातून स्वावलंबन निर्माण करण्यासाठी शिरजगाव कोरडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी कच्च्या साहित्यातून राख्या बनविल्या.
रक्षाबंधनाच्या पर्वावर गावकऱ्यांना गावातच राख्या उपलब्ध करून देत त्यातून खऱ्या कमाईचा आनंद लुटला. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शिरजगाव कोरडे येथील शाळेमध्ये एकूण ८५ विद्यार्थी शिक्षण घेतात. कोरोनामुळे गावातील परिसरात शिक्षक व शिक्षणमित्र ज्योती पनपालिया, आश्विनी ठाकरे यांच्या सहकार्यातून शिक्षण सुरू आहे. नियमित शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना सहशालेय उपक्रम राबविण्याबाबत गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर यांनी प्रेरित केले. यामधूनच केंद्रप्रमुख किशोर बकाले यांनी शिरजगाव कोरडे येथील आपल्या सहकाऱ्यांना राखी निर्मितीचा उपक्रम सुचविला. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वानखडे, राजेंद्र तामस्कर, निरंजन चव्हाण, प्रणिता कळवे यांनी आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांना देऊन त्याद्वारे राख्या कशा बनवायच्या, याबाबत मार्गदर्शन केले. राख्या बनवून त्याची प्रदर्शन न लावता यामधून कोरोना कालावधीत गावातील बंधू -भगिनींना गावातच राख्या उपलब्ध करून दिल्या. राख्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची खरी कमाईसुद्धा झाली.
स्वतःच राख्या बनविणार
यावर्षी आमच्या गुरुजींनी आम्हाला राखी कशी बनवायची, हे शिकवले. पुढील वर्षी मी स्वतःच साहित्य आणून राख्या बनविणार असल्याचे इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी माही संदीप चव्हाण हिने सांगितले.
स्वावलंबी उपक्रम
कोरोनोत्तर काळात आजूबाजूच्या परिस्थितीत प्रचंड बदल झाला आहे. भविष्यात मुले स्वतःच्या पायावर उभे व्हावीत म्हणून आम्ही शालेय उपक्रमाच्या माध्यमातून मुले स्वावलंबी कशी बनतील, या हेतूने उपक्रम राबवत असतो. आनंददायी पद्धतीतून शिक्षण देऊन आत्मनिर्भर होण्यासाठी राखी निर्मितीचा उपक्रम असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वानखडे यांनी सांगितले.