पोलीस आयुक्त : वाहतुकीला वळण लावण्याचा प्रयत्न अमरावती : अपघातमुक्त शहरासाठी जड वाहनांच्या प्रवेशवेळांचे पुनर्निर्धारण करण्यात येणार आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या वेळेनुसार अवजड वाहनांच्या शहरातील प्रवेशासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. वाळूची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना शहरात पूर्णवेळ बंदी करण्याबाबत शासन परिपत्रकानुसार निर्णय शक्य असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी दिली. हॉटेल, बार, दवाखान्यांना नोटीसशहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित राहण्यासाठी व्यावसायिकांचे सहकार्य लागणार आहे. शहरातील हॉटेल, बार, दवाखाने आदींनी त्यांच्या स्तरावर पार्किंग व्यवस्था करावी, यासाठी त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येणार आहेत. प्रतिष्ठानात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनाचे सुरक्षित पार्किंग ही त्या प्रतिष्ठान संचलकांची जबाबदारी आहे. यासाठी त्यांना थोडा कालावधीही दिला जाईल. त्यानंतर नियमभंग झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल. वाहतूक सल्लागार समिती कार्यान्वितवाहतूक नियमनाच्या उद्देशाने आयुक्तालयस्तरावर वाहतूक सल्लागार समिती कार्यान्वित होणार आहे. सर्वेक्षणानंतर केल्या जाणाऱ्या उपाययोजनेनच्या पहिल्या टप्प्यात ‘ट्रॉफिक अवेअरनेसवर भर दिला जाणार आहे. परवान्याविना वाहने शिकणाऱ्यांसह अल्पवयीन विद्यार्थी, त्यांचे पालकांना सूचना करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये मोहीम राबविली जाईल. दुसऱ्या टप्प्यात शाळा-महाविद्यालयातच लर्निंग लायसन्स कॅम्प आयोजित केला जाणार असल्याची माहिती डीसीपी पवार यांनी दिली. ट्रॅफिक सेन्स नसल्यामुळे समुपदेशन आणि जागृतीची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. (प्रतिनिधी)हॉटेल, बार संचालकांनी कर्मचारी नेमावाशहरातील बहुतांश हॉटेल व बारसह खासगी दवाखान्यांची पार्किंग व्यवस्था नाही. नियमानुसार शक्य नसले तरी एका रांगेत पार्किंग केले जाते. मात्र, तरीही अशा प्रतिष्ठानांसमोर अस्ताव्यस्त पार्किंग केले जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हॉटेल, बार संचालकांनी एखाद्या कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशा सूचनाही सीपींनी केल्या आहेत. टप्पानिहाय उपाययोजनाजड वाहतुकीला प्रवेशबंदी करण्यासाठी दीपार्चनसह अन्य काही ठिकाणी लोखंडी बार बसविण्यात आलेत. वाहतूक नियंत्रणासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असून टप्पानिहाय उपाययोजना राबविण्यावर भर राहणार आहे. आजपासून शहराचे संयुक्त सर्वेक्षण१६ फेब्रुवारीपासून पोलीस प्रशासन, महापालिका, बांधकाम विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त सर्वेक्षणाला इर्विन चौकातून सुरुवात होणार आहे. पार्किंग, नो-पार्किंग, अतिक्रमण, हॉकर्स झोन, थांबे, याबाबतीत हे सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणादरम्यान नोंदविलेल्या निरीक्षणाअंती दीर्घकालीन योजना प्रत्यक्षात साकारल्या जातील, असा विश्वास डीसीपी नितीन पवार यांनी व्यक्त केला.
जड वाहनांच्या प्रवेशवेळांचे पुनर्निर्धारण
By admin | Published: February 16, 2016 12:08 AM