धारणी : शहरातील कोविड केअर सेंटरवर कंत्राटी नियुक्तीकरिता आदिवासी तरुणांकडून प्रत्येकी १२ हजार रुपये वसूल केल्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्याने आता दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.
‘लोकमत’मध्ये यासंदर्भात वृत्त प्रकाशित होताच, जिल्हा परिषदेने चौकशी लावली. ही माहिती कर्मचारी गायगोले याला होताच, त्यांनी तात्काळ अजय डहाके या तरुणाच्या घरी धाव घेतली. त्याच्या तुमच्या मुलाने पेपरला दिलेली माहिती चुकीची आहे, असे लिहून देण्याची मागणी केली. आपण पैसे घेतले नाहीच, हे वदविण्यासाठी त्याची धडपड होती, अशी माहिती अजयने ‘लोकमत’ला दिली.
प्रकरणाची चौकशी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पांडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ही बाब तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी गायगोले यांना कळताच, गायगोलेने तात्काळ कार्यालय सोडून अजय डहाके यांचे घर गाठले. पण, अजय हॉटेलवर काम करत असल्याने तो घरी नव्हता. त्याचे आई-वडील घरी होते. तुमचा पोरगा कागाळ्या कशाला करीत आहे? पेपरला दिलेली माहिती मी चुकीने दिली, असे त्याच्याकडून मला लिहून द्या, असे गायगोलेने म्हटले. त्यावर अजयच्या वडिलांनी तो घरी नसल्याचे उत्तर देऊन परत पाठविले व लगेच अजयला फोनवर गायगोले हा घरी येऊन गेल्याची माहिती दिली. या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------