लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत पीक विमा योजना व पुनर्रचित हवामानवर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये यंदा ‘मेरे पॉलिसी, मेरे हाथ’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची मूळ पावती घरपोहोच देण्यात येणार आहे. संकल्पना चांगली असली, तरी योजनेत कंपन्यांचे नव्हे तर शेतकऱ्यांचे हित जोपासा, अशी मागणी होत आहे.या अभियानात शेतकऱ्यांना विम्याची रक्कम विमा उतरविलेल्या पिकाचे प्रकार, विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र, विमा हप्त्याची रक्कम, आदी तपशिलाचा रेकाॅर्ड प्राप्त होईल. ही माहिती विमा दाव्याच्या प्रकरणी महत्त्वाची ठरणार आहे. पीक विमा योजनेतील उणिवा दूर करण्यासोबतच जागरूकता निर्माण करण्यास मदत होण्यास होणार आहे. याशिवाय योजनेविषयीचे गैरसमज दूर होणार आहे. अभियान १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
२०२१ मध्ये १.८१ लाख अर्जसन २०२१मध्ये १,८१,०२७ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये ५५,६६१ शेतकऱ्यांना ३१.१० कोटींचा विमा देण्यात आला. फळपीक विमा योजनेत ५,५२१ व आंबिया बहरासाठी २,५६४ शेतकऱ्यांनी सहभाग होता.
यंदा २,१९,१०१ शेतकऱ्यांचा सहभागप्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदा २,१९,१०१ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. सोयाबीन पिकासाठी सर्वाधिक १,१७,००३ शेतकरी सहभाग आहे.
५६ हजार शेतकऱ्यांना मिळाले ३४ कोटीगतवर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ५६,१६२ शेतकऱ्यांना ३५.२६ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. यामध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी भरपाई ३,१३३ शेतकऱ्यांना मिळाल्याचे वास्तव आहे.
सर्वाधिक विमा सोयाबीनचायंदा पीक विमा योजनेमध्ये सर्वाधिक १,१७,००३ शेतकऱ्यांचा सहभाग सोयाबीन पिकासाठी आहे. याशिवाय तुरीसाठी ४१,९६८ व कपाशीसाठी १९,९९३ शेतकऱ्यांनी सहभागी आहे.
गतवर्षी पीक विमा न मिळाल्याच्या तक्रारीगतवर्षी सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातुलनेत कंपन्यांनी विमा भरपाई न दिल्याने शेकडो तक्रारी दाखल झाल्या होत्या.
विमा कंपन्यांचेच भले नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना कंपनीद्वारा ४० टक्क्यांपेक्षा कमी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येते. केवळ कंपन्यांचे चांगभल करण्यासाठी पीकविमा असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतल्या जात नसल्याचा आरोप आहे.
काय आहे ‘माझी पॉलिसी, माझ्या हातात’?‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ हे विमा कंपन्यांद्वारा अभियान आहे. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी सहभाग घेतलेली मूळ पॉलिसी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
पीकविमा कंपनीद्वारा खरीप पीक व फळपीक विम्यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना पीक विम्याची मूळ पॉलिसी देण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये जिल्हाभरात हे अभियान राबविले जाणार आहे.- अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.