अमरावती : अॅमेझॉन नदीच्या धर्तीवर जलपुनर्भरणासाठी रिचार्ज बंधारा तिवसा तालुक्यातील पिंगळाई नदीपात्रात प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणार आहे. पथदर्शी स्वरूपात देशातला हा पहिलाच रिचार्ज बंधारा राहणार आहे. यामुळे जमिनीतील भूजलपातळी वाढून शेतक-यांना बारामाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणार आहे.
केंद्र शासनाच्या जलसंपदा व नदी विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय भूमिजल बोर्डाच्या अधिकारी व तंत्रज्ञांच्या पथकाने नदीपात्रात आॅटोमॅटिक सॉईल टेस्ट युनिटच्या साहाय्याने परीक्षण केले आहे. ज्या ठिकाणी रिजार्च बंधारे बांधले जाणार आहे. त्या ठिकाणाचे तांत्रिक मोजमाप घेण्यात आले आहे. अशाप्रकारचे बंधारे दक्षिण आफ्रिकेतील अॅमेझॉन नदीच्या पात्रात आहे. त्याच धर्तीवर पिंगळाई नदीवर बंधारे बांधले जाणार आहेत. त्यामुळे तिवसा व आसपासच्या परिसरात पाण्याची टंचाई निकाली निघेल, असा विश्वास या पथकाने व्यक्त केला.
भाजपाच्या प्रदेश चिटणीस निवेदिता दिघडे-चौधरी यांनी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या भागातील नदीविकासाचा मुद्दा दोन वर्षांपासून रेटून धरला होता. ना. गडकरी यांच्या सूचनेनुसार केंद्रीय भूमिजल बोर्डाच्या शास्त्रज्ञांनी या आठवड्यात तिवसा येथील पिगंळाई नदीच्या भौगलिक स्थितीची पहाणी केली. या पथकात शास्त्रज्ञ पी.के.जैन, एस.के,भटनागर, परवेज खान यांचा समावेश आहे. यावेळी निवेदिता दिघडे, दिलीप नारींगे, तिवसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिन गाडे, स्वप्नील भुयार, शेतू देशमुख, संजय चांडक आदी चमू उपस्थित होते. केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाकडून या बंधाºयाला लवकरच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याची माहिती शास्ज्ञज्ञ डॉ.पी.के. जैन यांनी उपस्थितांना दिली.
पाच ठिकाणी रिचार्ज बंधारे, २० कोटींचा खर्च पिगंळाई नदीपात्रात पाच विविध ठिकाणी आधुनिक पद्धतीचे रिचार्ज बंधारे बांधले जाणार आहेत. या बंधाºयांना आॅटोमॅटिक रिडायल गेट असणार आहे. पारंपरिक कोल्हापुरी बंधाºयांना लोखंडी गेट असतात व ते वेगवेगळी करून लावली जातात. त्यातून पाण्याची गळती होते. ब-याचदा ते चोरी जातात. यामध्ये आॅटोमॅटिक रिडायल गेट असल्यामुळे रिचार्ज शॉफ्टच्या माध्यमातून परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढून सिंचन करणे सुकर होईल. बंधा-यासाठी ३०० मीटर लांब भागाचे खोलीकरण करण्यात येणार असल्याचे शास्त्रज्ञ जैन म्हणाले.