अधिसूचना जाहीर : होमिओपॅथ करणार अॅलोपॅथीचे उपचारगजानन मोहोड अमरावतीकायद्यातील काही तरतुदीमुळे होमिओपॅथी डॉक्टरांना रुग्णसेवा देताना अॅलोपॅथी औषधांचा वापर करणे शक्य नव्हते. एकीकडे कायदा व दुसरीकडे रुग्णांच्या अपेक्षा यामध्ये होमिओपॅथीची घुसमट व्हायची. आता त्यांना रीतसर अॅलोपॅथीचा वापर करता येणार आहे. यासाठी त्यांना एक वर्षाचा आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. येत्या आॅगस्ट २०१६ पासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालयांत या अभ्यासक्रमाला सुरुवात होत आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी हा अभ्यासक्रम नवसंजीवनी ठरणार आहे. होमिओपॅथीचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अॅलोपॅथीचा वापर करणाऱ्यांसाठी आवश्यक असणारा मॉडर्न फॉर्मकोलॉजी (आधुनिक औषध निर्माणशास्त्र) अभ्यासक्रम राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत सुरू करण्याची अधिसूचना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांनी काढली आहे. त्यामुळे होमिओपॅथीचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर अॅलोपॅथीचा उपचार करता येणार आहे. त्यांना आधुनिक उपचार पद्धतीचा व्यवसाय करण्यास अनेक बंधने होती. ३० वर्षांपासून या होमिओपॅथची मागणी होती. आरोग्य सुविधा देणाऱ्या या डॉक्टरांना अॅलोपॅथीचा वापर करण्याची अनुमती द्यावी यासाठी मोर्चा, निदर्शने, धरणे आदी मार्गाचा अवलंब करून संघटनांनी ही मागणी रेटून धरली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये होमिओपॅथी डॉक्टरांनी एक वर्षाचा औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अटीवर आधुनिक उपचार पद्धतीची मान्यता दिली होती व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा एक वर्षाचा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचे आदेश दिले होते. आॅगस्ट २०१६ पासून शासकीय वैद्यकीय हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. एक वर्षाचा नवीन अभ्यासक्रममॉडर्न फॉर्मकोलॉजी हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे. १०८ दिवस प्रत्यक्ष उपस्थित राहून हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. अभ्यासक्रमासाठी नोंदणीकृत होमिओपॅथी महाविद्यालयाकडे नोंदणी करून प्रवेश मिळणार आहे. सध्या १३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ६० हजार होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासायापूर्वीच्या आघाडी सरकारने ९ जानेवारी २०१४ च्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने महाराष्ट्र समचिकित्सा अधिनियम १९५९ व महाराष्ट्र वैद्यक परिषद अधिनियम १९६५ यामध्ये सुधारणा व दुरूस्तीसह विधेयक मंजूर करून शिक्कामोर्तब केले व आता आधुनिक औषधशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीचे उपचार करता येणार आहे. या निर्णयाचा राज्यातील ६० हजार होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. काय आहे ‘फॉरमॉकोलाजी’ ?आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत एक वर्षाचा फॉर्मकोलॉजी अॅन्ड क्लिनिकल कोर्स (आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र) हा एक वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण करावा लागणार आहे. सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमासाठी ५० हजार रूपये शुल्क राहणार आहे. येत्या आॅगस्ट २०१६ पासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
‘मॉडर्न फॉर्मकोलॉजी’ अभ्यासक्रमास मान्यता
By admin | Published: March 27, 2016 12:02 AM