अमरावती : लसीकरणाला कधी ब्रेक, तर कधी दोन ते तीन दिवसाआड लसीकरण अशा स्थिती होती. परंतु, असे असले तरीही आरोग्य विभागाने लसीकरणात सातत्य ठेवले. परिणामी आतापर्यंत १० लाखांचा लसीकरणाचा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे, लसीकरण मोहिमेत आरोग्य यंत्रणेने २१ ऑगस्ट रोजी या एकाच दिवशी तब्बल पहिला व दुसरा डोज मिळून ३० हजार ८५० जणांचे लसीकरण करण्यातही यश मिळविले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्यामुळे कधी ब्रेक, तर काही वेळा विक्रम अशा विरोधाभासी प्रसंगाना पुढे जात आरोग्य यंत्रणेने लसीकरणाचा आतापर्यंत १० लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या महिन्यात लस उपलब्ध नसल्यामुळे तब्बल आठवडाभर नागरिकांची प्रतीक्षा सुरू होती. परंतु, नंतरच्या काही दिवसांत ही प्रतीक्षा संपली. प्रारंभीच्या काळात लसीकरण आकडे पाठ फिरवणाऱ्या नागरिकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लसीचे महत्त्व कळू लागले. त्यामुळेच एकेकाळी लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मेळघाटातील चिचखेड गावात ४५ वर्षावरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याचा राज्यात पहिला मान मिळविला आहे. प्रारंभी लस घेण्यासाठी कोणी पुढाकार घेत नव्हते. नंतरच्या काळात मात्र सर्वांनाच लस हवी, असे चित्र निर्माण झाले. त्यासाठी ऑनलाईन, ऑफलाईन अशी दुहेरी पद्धत वापरण्यात आली तरीही अनेक केंद्रांवर नागरिकांची गर्दी ओसरत नव्हती. लोकांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या. आज ना उद्या असे करत रोज रांगेत लागायचे आणि लस मिळवायची, असा चंग त्यांनी बांधला होता. या काळात नागरिक आणि आरोग्य यंत्रणेची अधिकाऱ्यांमधील खटके उडाले. परंतु, लसीचे महत्त्व कळताच नागरिकांचा लसीकरणाकडे कलही वाढला. यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने या काळात चार विक्रमी स्थापन केले. यापैकी तीन विक्रम दिवसभरात २० हजारांपेक्षा अधिक लसीकरणाचे असून, एक विक्रम ३० हजारांच्या पार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा लसीकरणाचे डॉ. विनोद करंजीकर, सांख्यिकी अधिकारी राजकुमार मुळे यांनी रोजच्या कामात अधिक गती आणली आहे.
बॉक्स
दृष्टिक्षेपात लसीकरण
पहिला विक्रम ३ जुलै - २७ हजार ५०
दुसरा विक्रम १४ -२५२१४
तिसरा विक्रम १७ ऑगस्ट -२१ हजार २६
चौथा विक्रम २१ ऑगस्ट ३० हजार ८५०