रजिस्टरची पूर्तता अनिवार्य : प्रशासकीय शिस्तीचा आदेशअमरावती : कार्यालयीन वेळेत प्रत्येक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हालचालींची तसेच कर्मचाऱ्याला त्याचा विभाग वा कार्यालय सोडण्यापूर्वी तो कुठे जाणार आहे, याची नोंद ठेवावी लागणार आहे. यावर संबंधित विभागप्रमुखांची करडी नजर राहणार आहे. प्रत्येक कर्मचारी-अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावा, यासाठी हा नवा आदेश पारित करण्यात आला आहे. बहुतांश कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडतात. ते थेट सायंकाळीच उगवतात. अनेकजण कार्यालयीन वेळेत पानटपरीवरही दिसतात. हे टाळण्यासाठी आणि प्रशासन गतिमान करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. १२३ पेक्षा अधिक लेटलतीफ अधिकारी- कर्मचाऱ्यांची एक दिवसाची वेतनकपात केल्यानंतर हा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे. २४ पेक्षा अधिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर ५० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचा ‘वॉच’ राहणार आहे. महापालिकेच्या अख्त्यारितील २४ विभागांची झाडाझडती घेण्यासाठी सोमवार ते शनिवार वेळपत्रक आखून दिले आहे. सोमवारी पर्यावरण अधिकारी महेश देशमुख हे जीएडीमधील उपस्थिती पाहतील तर शनिवारी ही जबाबदारी स्वप्निल जसवंते यांच्याकडे देण्यात आले आहे. सोमवार ते शनिवार असे सहा दिवस वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे २४ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन वेळेबाबत शिस्त निर्माण व्हावी व दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये, सर्व शासकीय आणि नागरिकांची कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत, याबाबी विचारात घेऊन नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने तपासणीचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. (प्रतिनिधी)असा आहे आदेश नेमून दिलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रथम त्यांच्या कार्यालयामधील हजेरीपत्रात स्वाक्षरी करावी. सोबतच्या तक्त्यात नेमून दिल्याप्रमाणे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजता नेमून दिलेल्या विभागास भेट देऊन तपासणीच्या वेळी अनुपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावासमोर हजेरी बुकवर लाल पेनाने खुण करावी व त्याखाली स्वाक्षरी करावीसकाळी १० वाजता भेट देऊन तपासणी केल्यानंतर त्याच कार्यालयात दिवसभरात कोणत्याही वेळी अचानक भेट देऊन तेथील हालचाल रजिस्टरची तपासणी करावी. जे कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असतील व त्यांनी नोंदवहीत नोंद घेतली नसेल तर अशा कर्मचाऱ्यांचे त्यादिवसाचे विनावेतन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. नियुक्त अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा त्या विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यविवरण नोंदवही तपासावी.संबंधित कर्मचाऱ्याकडे किती संदर्भ प्राप्त झाले, त्यापैकी कितीचा निपटारा केला व किती संदर्भ प्रलंबित आहेत, याचा आढावा घ्यावा. कुठल्याही कार्यवाहीविना नस्ती अकारण प्रलंबित असल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करावी.
प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ‘हालचालीं’ची नोंद
By admin | Published: April 12, 2017 12:38 AM