दुर्मीळ पोवळा सापही आढळला
अनिल कडू
परतवाडा:- नामशेष होण्याच्या मार्गावरील अर्थात रेड झोनमधील अतिशय दुर्मीळ असा भारतीय अंडीखाऊ साप (इंडियन एग ईटर) ची परतवाड्यात पहिल्यांदा नोंद झाली आहे.
वन्यजीवप्रेमी एन्व्हायरमेंटल लाईफ सोसायटी, परतवाडाचे सर्पमित्र जय तायडे, सागर पेंढारकर, तिलक यादव, संतोष काळे व सदस्यांना हा अंडीखाऊ साप देवमाळी-नारायणपूर मार्गावरील परिसरात पाच दिवसांपूर्वी आढळून आला. याच सर्पमित्रांना अचलपूर शहरातील जीवनपुरा परिसरात दुर्मीळ असा पोवळा (स्लेंडर कोरल) साप मिळाला. त्यांनी या सापांना पकडले.
पकडलेल्या या दोन्ही दुर्मीळ सापांना सर्पमित्रांनी परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचते केले. या सापांची त्या ठिकाणी नोंद घेण्यात आली. परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांच्या मार्गदर्शनात वनपाल नितीन अहिरराव व प्रदीप बाळापुरे यांना सोबत घेऊन सर्पमित्रांनी या दोन्ही दुर्मीळ सापांना मेळघाटच्या वनक्षेत्रात नेऊन सोडले.
भारतीय अंडीखाऊ साप
झाडांवरील पक्ष्यांची अंडी हा साप खातो. तो शांत स्वभावाचा, निमविषारी आहे. देशात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या १२ प्रजातींपैकी हा साप आहे. या सापाला पाळणारीही काही मंडळी आहे. आकर्षक रंगसंगतीतील या सापाला चिडवल्यास, डिवचल्यास शरीर आखूड करून तो हल्ला करतो. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ मधील भाग २ मध्ये या सापाचा समावेश होतो.
------------------
पोवळा साप
अत्यंत विषारी व दुर्मीळ असा हा साप आहे. वनांमध्ये पानांच्या कचऱ्याखाली तो आढळतो. दोन ते सहा अंडी देतो. याचे डोके व मान काळ्या रंगाची आहे. डोक्याच्या वरच्या बाजूस दोन सुस्पष्ट पिवळे डाग दिसतात. शेपटीच्या पायथ्याशी शेपटीवर काळ्या रंगाची रिंग आहे.