लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील चार आर्थिक वर्षातील संपूर्ण दस्तावेज (फायली) जप्त करण्यात आला आहे. जप्तीच्या कारवाईनंतर कपाटे सीलबंद करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांच्या नेतृत्वात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने नगर परिषद प्रशासनासह राजकारण्यांमध्येही हलकल्लोळ माजला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये झालेली हे जप्तीप्रकरण नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.बांधकाम विभागातील सन २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ व २०१७ -१८ या चार आर्थिक वर्षातील सर्व फायली जप्त करून कपाटात सील करण्याच्या कारवाईस नगर परिषद प्रशासनाने दुजोरा दिला असला तरी मुख्याधिकारी ‘नॉट रिचेबल’ असल्याने प्रशासनाची बाजू समजू शकली नाही. रेकॉर्ड जप्त करत असताना नगर परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसल्याचे चित्र यावेळी अनुभवयास मिळाले.जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आदेश आल्याने सन २०१४ ते आतापर्यंतचे नगर परिषदेच्या फक्त बांधकाम विभागाचे रेकॉर्ड जप्त करण्यात आले. ते कपाटामध्ये बंद आहेत. यानंतर या फायलीचे नगर परिषदेच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर विशेष अंकेक्षण (लेखापरीक्षण) करण्यात येईल. आपल्याला केवळ रेकॉर्ड सील करण्याचा आदेश होते. त्यानुसारच कारवाई केल्याचे उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक म्हणाले. नगरपालिका प्रशासनात बांधकाम विभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्य सर्व विभागाच्या तुलनेत या विभागाचे आर्थिक बजेट अधिक असते. बांधकाम विभागाकडून होणाऱ्या अनेक कामांवर अनेकवेळी अनियमिततेचे आरोप केले जातात. या विभागातील कमिशनखोरीही सर्वज्ञात आहे. त्याअनुषंगाने जप्त फायलीमधून काय निघणार, याकडे राजकीय धुरिणांसह प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे.दरम्यान, चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या दस्तावेज जप्ती आदेश असल्याने आम्हाला कारवाई करायची आहे, एवढेच कारवाई पथकाने सांगितल्याचे नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी यांनी सांगितले.घरकुलासंबंधी चर्चेला उधाणचांदूर रेल्वे नगर परिषदेत अलीकडेच घरकुल घोटाळा प्रकाशात आला. त्याबाबत ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्याअनुषंगाने ही कारवाई नसावी ना, अशी शक्यता व्यक्त होत आहे. यासंदर्भात बांधकाम सभापती कल्पना लांजेवार व मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मुख्याधिकारी-नगरसेवकांत विळ्या-भोपळ्याचे सख्यनगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांची वरूड नगर परिषदेत बदली झाली. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेत कार्यरत मिलींद दारोकार यांची चांदूर रेल्वेला बदली झाली. रुजू झाल्यापासून नगराध्यक्षांसह सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षांच्या नगरसेवकांशी त्यांचे जमले नाही. अनेकदा नगरसेवक व त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. नगर परिषदेमध्ये रुजू झाल्यापासून कार्यालयीन कामकाजात कमी दिवस हजर राहून, ते कार्यालयीन कामकाजात अत्यल्प सहभागी होत असल्याचा आरोप नगरसेवक करीत होते. गुरुवारच्या कारवाईस ही वादाची किनार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे रेकॉर्ड सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 1:12 AM
नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील चार आर्थिक वर्षातील संपूर्ण दस्तावेज (फायली) जप्त करण्यात आला आहे. जप्तीच्या कारवाईनंतर कपाटे सीलबंद करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांच्या नेतृत्वात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : एसडीओंच्या नेतृत्वात चांदूर रेल्वेत कारवाई