अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यंदा उन्हाळी २०१९ परीक्षेच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी गोपनीय विभागाकडून पुनर्मूल्यांकनाअंती मूल्यांकनात तफावत ठेवणा-या ‘व्हॅल्यूअर’विरुद्ध नियमानुसार कारवाई होणार आहे. निकालात त्रुटी, मूल्यांकनात घोळ असल्याबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा ओघ वाढलेला आहे.
यंदा बी.कॉम., बी.एस्सी., बी.ए. शाखांमध्ये सर्वाधिक मोठी विद्यार्थिसंख्या आहे. याच शाखांमध्ये निकालात उणिवा असल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा विभागाने विद्यापीठ कायद्यान्वये मूल्यांकन निदेशातील तरतुदीनुसार मूल्यांकनात तफावत ठेवणारे ‘व्हॅल्यूअर’ यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. हल्ली पुनर्मूल्यांकन वेगवान पद्धतीने केले जात आहे.
मूळ मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनानंतरचे गुण याची पडताळणी केली जाणार आहे. १६ टक्क्यांपेक्षा अधिक गुण वाढल्यास याबाबत दोषी ‘व्हॅल्यूअर’विरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. परीक्षा विभागाने गोपनीय विभागाला त्याअनुषंगाने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत किती ‘व्हॅल्यूअर’विरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाते, याकडे नजरा लागल्या आहेत.
पुनर्मूल्यांकनात १६ टक्क्यांवर गुण वाढल्यास त्या पेपरचे पुन्हा मूल्यांकन केले जाते. पहिल्या व दुसºया ‘व्हॅल्यूअर’ने दिलेल्या गुणांची पडताळणी केली जाते. दोषी असलेल्या ‘व्हॅल्यूअर’कडून पाच हजरांचा दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद केली जाणार आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ अमरावती विद्यापीठ.