चांदूरबाजार : ३० वर्षांपासून तलाठी कार्यालय म्हणून वापरात असलेली बेलोरा मार्गावरील इमारत आज अखेरच्या घटका मोजत आहेत. ही इमारत जीर्ण झालेली असून देखभालीअभावी या कार्यालय परिसराचा वापर आता प्रसाधनगृह म्हणून केला जात आहे. इतकेच नव्हे तर या तलाठी कार्यालयाच्या बाजूने असलेल्या शासकीय जागेत गेल्या कित्येक वर्षापासून गुरे-ढोरे बांधली जात आहे. तसेच दारे व खिडक्या मोडक्या अवस्थेत असल्याने तलाठ्यांचे ‘रेकॉर्ड’च असुरक्षित झाले आहे. अशा परिस्थितीतही या कार्यालयात तलाठ्याचे कामकाज सुरु आहे. या इमारतीचे भाडे म्हणून येथे कार्यरत तलाठ्याच्या वेतनातून दरमहा १२०० रूपयाची कपात केली जाते. या कार्यालयाच्या दुरवस्थेविषयी येथील कार्यरत तलाठ्यांनी अनेकदा उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र आजतागायत कोणीही या बाबीची दखल घेतल्याचे दिसत नाही. बेलोरा रस्त्यावरील तलाठी कार्यालय ८ ते ९ तलाठ्यांनी पदभार सांभाळला. या दरम्यान या कार्यालयाची एकदाही डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे या १५०० चौ. फुट शासकीय जागेपैकी ३५० चौरस फुट जागेत बांधलेल्या या कार्यालयाची इमारत पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. भिंतीला खालच्या बाजूने तडा गेल्या आहेत. आजूबाजूच्या जागेचा वापर प्रसाधनासाठी करण्यात येत असल्यामुळे भिंतीच्या विटा गळून पडण्याच्या अवस्थेत आहेत. दारे, खिडक्याही तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे येथील रेकॉर्ड सुरक्षित नाही. इतकेच नव्हे तर बाजूच्या ७५० चौरस फुट शासकीय जागेत गुरे-ढोरे बांधली जातात. तलाठी कार्यालय बांधले खरे मात्र त्याठिकाणी तलाठ्याच्या निवासाची कोणतीही व्यवस्था नाही तेथे शौचालय व स्नानगृहाचीही व्यवस्था नाही. पाण्याचीही व्यवस्था नाही, कार्यालयाचे बाजूला डुकरांचा मुक्त संचार असल्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही इमारत शासकीय असल्यामुळे येथे कार्यरत तलाठ्याच्या वेतनातून दरमहा १२०० रूपये भाडेभत्ता कापल्या जातो. सुविधा मात्र काहीही देण्यात येत नाही. याबाबत येथील कार्यरत तलाठ्यांनी अनेकदा या कार्यालयाच्या शिकस्त व असुविधेबाबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना तक्रारी वजा निवेदने दिली. मात्र याची दखल तर घेण्यात आलीच नाही तर या निवेदनाची पोचही संबंधित तलाठ्याला तहसील कार्यालयामार्फत देण्यात आली नाही. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात नवीन आठ तलाठी कार्यालयाची उभारणी करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक ६४ लाखाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आला आहे. त्यातून प्रत्येक तलाठी कार्यालयासाठी आठ लाख रूपये खर्च केल्या जाणार आहेत. त्यात या तलाठी कार्यालयाचा दुरूस्तीचा प्रस्ताव आहे की नाही हे अनाकलनीय आहे. आताच जर या कार्यालयाची दुरूस्ती झाली नाही तर येत्या पावसाळ्यात हे कार्यालय जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. वर्षाला लाखोचा महसूल देणाऱ्या या तलाठी कार्यालयाकडे दुर्लक्ष आहे.
तलाठ्यांचे ‘रेकॉर्ड’ असुरक्षित
By admin | Published: November 25, 2014 10:48 PM