अमरावती : महावितरणकडे वीज देयक वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने तांत्रिक कर्मचार्यांना या कामात जुंपण्यात आले आहे. परिणामी ग्रामीण भागातील तांत्रिक कामे खोळंबली आहे. वीज खंडित होत असल्याने कर्मचार्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. महावितरणामध्ये वीज देयक वसुलीसाठी स्वतंत्र कर्मचारी नाहीत. वायरमन, सहायक वायरमन, विद्युत सहायक यासारख्या विविध तांत्रिक कर्मचार्यांकडे वीज देयक वसुलीचे काम देण्यात येते. कर्मचार्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. खंडित वीज पुरवठा सुरक्षित करण्याचे कामे करावे की, अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानुसार वीज देयकांची वसुली करावी या संभ्रमावस्थेत हे तांत्रिक कर्मचारी आहेत. वरिष्ठ अधिकार्यांचा स्थानिक अभियंत्यावर व त्यांच्या अधिनस्त तांत्रिक कर्मचार्यांवर दबाव असल्याने ही कामे निमूटपणे करावे लागत आहे. वीज गळती रोखून वीज वापर वसुलीचे प्रमाण वाढविणे, विद्युत पुरवठा नियमित करणे व वेळापत्रकाचे नियोजन तसेच देयकांच्या वसुलीचेही काम करावे लागत आहे. विद्युत पंपाच्या देयकांची वसुली वर्षानुवर्षे प्रलंबित राहत असल्यामुळे काही महिन्यांपासून वसुलीचा धडाका कर्मचार्यांनी लावला आहे. प्रलंबित वीज देयकाची वसुली व याच अनुषंगाने वीजपुरवठा खंडित करण्याचे काम तांत्रिक कर्मचार्यांकडे असल्याने अधिकार्यांच्या दबावात ही कामे करावी लागत आहे. हा सेवेचा भाग असा महावितरणचा सुरक्षात्मक पवित्रा असला तरी याबाबत कुठलाही लेखी आदेश या तांत्रिक कर्मचार्यांना देण्यात येत नाही. (प्रतिनिधी)
तांत्रिक कर्मचार्यांकडे वीज देयकांच्या वसुलीचे काम
By admin | Published: June 07, 2014 11:41 PM