- सदानंद लाहेवारबिजोरा (यवतमाळ) : विविध पथकांची स्थापना करून शिक्षण विभाग कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याचा दावा करीत असला तरी महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. मराठीच्या पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांना कॉप्या पुरविण्यासाठी नातेवाईकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे शाळा परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे.गुरुवारी दहावीचा मराठीचा पहिला पेपर होता. या परीक्षा केंद्रावर २४० विद्यार्थी परीक्षा देत आहे. या ठिकाणी केंद्र प्रमुख, उपकेंद्र प्रमुख, बैठे पथक, पर्यवेक्षक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियानाची जय्यत तयारी केली असतानाच मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉपीबहाद्दरांनी चांगलाच गोंधळ घातला. शाळा परिसरात खुलेआम प्रवेश करून थेट वर्गात शिरून विद्यार्थ्यांना कॉपी दिली जात आहे. पालकांसोबत काही शिक्षकही मर्जीतील विद्यार्थ्यांना सहकार्य करीत असल्याचे आढळले. आत प्रवेश न मिळालेले नातेवाईक खिडक्यांमधून आपल्या पाल्यांपर्यंत कॉपी पुरवत आहे. वर्गात असलेले पर्यवेक्षकही या प्रकाराला मज्जाव करीत नाही. विशेष म्हणजे गत १५ वर्षांपासून येथे दहावीचे परीक्षा केंद्र आहे. अनेक विद्यार्थी हमखास पास होता येते म्हणून या ठिकाणी प्रवेश घेतात. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील विद्यार्थी देणगी देवून या शाळेत प्रवेश घेवून पास होतात.या सर्व प्रकारात हुशार विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. शिक्षण विभागही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 5:11 AM