कॅप्शन - बनावट संकेत स्थळावरील याच आदेशाद्वारे नोकरभरतीची प्रक्रिया जाहीर केली.
-------------------------------------------------------------------
सायबर पोलिसांत तक्रार, ‘एटीसीएएमटी’ संकेत स्थळावर नाेकरभरतीचे बनावट आदेश
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या नावे नोकरभरतीचे बनावट आदेश व्हायरल होत आहेत. याबाबत आदिवासी विभाग प्रशासनाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये उमेदवारांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
२५ मार्च २०२१ रोजी वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पात्र उमेदवारांना मूळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, हा प्रकार बनावट, फसवेगिरीचा असल्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभाग आयुक्तालयाच्या नावे बनावट आदेशाद्वारे नाेकरभरती व्हायरल झाली आहे. मात्र, व्हायरल झालेली पोस्ट आणि लिंक ही आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तालयाची नसून, लिंकमुळे येणारे संकेत स्थळ हे बनावट असल्याचे समोर आले आहे. हे संकेत स्थळ आणि त्यातील मजकूर हा मुख्य आदिवासी विकास आयुक्तालयाच्या संकेत स्थळाप्रमाणेच तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या संकेत स्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तीला ते खरे आहे की खोटे, हे कळणार नाही. या बनावट संकेत स्थळावर पी.बी. गावंडे नामक व्यक्ती आदिवासी विकास विभागाचा सहायक आयुक्त आहे. त्यामध्ये गुंतलेली टोळी बेरोजगार उमेदवारांची फसवूक करीत असल्याचे ‘ट्रायबल’च्या निदर्शनास आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासन परिपत्रक ७४ (अ) तसेच आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नाशिक यांच्या आदेशान्वे आदिवासी विकास विभाग, अमरावती यांच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा परिचर या सर्व पदांसाठीच्या पात्र उमेदवारांची मूळ कागदपत्रांची तपासणी ५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजता अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयात करण्यात येईल, असे बनावट संकेतस्थळावरील आदेशात नमूद करण्यात आले. यात बेरोजगार तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, संकेत स्थळाबाबत सायबर पोलिसांकडे मंगळवारी तक्रार देण्यात आली.
----------------
चार अपर आयुक्त, २९ प्रकल्प अधिकारी स्तरावर नोकरभरती नाही
आदिवासी विकास विभागाची नागपूर, अमरावती, ठाणे व नाशिक अशी अपर आयुक्त कार्यालये आहेत, तर राज्यात २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये असून, येथे कोणत्याही प्रकारची नोकरभरतीची जाहिरात काढण्यात आली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाकाळात नोकरभरती बंद असून, कोणीही उमेदवारांकडे पैशांची मागणी अथवा अन्य गैरमार्गांचा अवलंब केल्यास थेट पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------
कोणी तरी हे कृत्य खोडसाळपणे, गैरहेतूने केले आहे. आदिवासी विकास विभागाची बदनामी करण्याच्या दृष्टीने अशी बनावट आदेशाद्वारे नाेकरभरती सोशल मीडियावर जारी केली आहे. याबाबत अमरावती सायबर पोलिसांकडे मंगळवारी तक्रार दाखल केली.
- विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.