अमरावती : राज्यात महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने उच्च शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. असे असताना गत दोन वर्षांपासून २०८८ सहायक प्राध्यापकांच्या भरतीची फाईल मात्र मंत्रालयात बंद करून ठेवली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत महाविद्यालयीन उन्हाळी २०२३ परीक्षांना प्रारंभ होत असल्याने शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर उभा ठाकला आहे.
राज्य सरकारने गत दोन वर्षांपृूर्वी २०८८ सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने विभागनिहाय महाविद्यालयांची संख्यादेखील निश्चित करण्यात आली होती. तथापि, या दरम्यान कोरोना संसर्गाचे आगमन झाले आणि सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रखडली. तेव्हापासून ही फाईल उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयात प्रलंबित आहे. अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाचही जिल्ह्यांतील अनुदानित महाविद्यालयांमध्ये १२६ सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रखडली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या समस्येकडे आवर्जून लक्ष द्यावे, अशी मागणी प्राध्यापक फोरमच्यावतीने करण्यात आली आहे.
सहायक प्राध्यापकांच्या भरतीचा विषय हा धोरणात्मक आहे. भरती प्रक्रिया राबविण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे. अधिवेशनानंतर या विषयाला गती येईल. एकंदरीत २०८८ सहायक प्राध्यापकांची पदे भरती केली जाणार आहे.
- शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च व शिक्षण विभाग, पुणे