मोहन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आपण प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू मातीच्या तयार केलेल्या गणपती मूर्ती बघितल्या. मात्र यंदा लाल मातीपासून विघ्नहर्त्याच्या मूर्तीचा नवा ट्रेंड दिघी महल्ले येथील कुंभार बांधवांच्या तिसऱ्या पिढीने साकारला आहे.
(Red clay Ganesha idols are taking shape on the banks of river Wardha)
धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या तिरावरील अडीच हजार लोकवस्तीचे दिघी महल्ले येथे कुंभार बांधवांचे १५ ते २० कुटुंब राहतात. यातील दहा कुटुंब तीन पिढ्यांपासून गणपती मूर्ती तयार करण्याचे काम करतात. वझे नामक कुटुंबाची तिसरी पिढी गणपतीच्या मूर्ती बनवितात. ओंकार वझे त्यांचे बंधू श्रीकृष्ण, तर जानरावनंतर आता तिसरी पिढी ओमेश वझे मातीच्या गणपती मूर्ती गणपती तयार करण्याचे काम अखंडपणे करीत आहे.
अशा होतात लाल मातीच्या मूर्ती तयार
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा विपरीत परिणाम मानवी जीवन शैलीवर होतो. शाडू मातीची किंमत अधिक आहे. त्यामुळे येथील कुंभार कुटुंबीयांनी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सावरगाव येथून लाल माती मार्च महिन्यात आणली. शंभर फुटाचा लाल मातीचा ट्रक नऊ हजार, तर दहा हजार रुपयांचा कलर लागतो. वझे कुटुंबीय साच्याऐवजी कलाकृतीला महत्त्व देत हातानेच मूर्ती तयार करीत आहे. ही प्रक्रिया मार्च महिन्यापासून तर रक्षाबंधनापर्यंत चालते. पावसाळ्यात मातीचा बचाव करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यंदा त्यांनी ऑरेंज कलरच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. गणरायाचं किरीट तेही सोनेरी आहे. काळी-पांढऱ्या रंगांनी डोळे बोलके बनले आहेत. सर्व मूर्ती सुंदर, सुबक आणि आकर्षक आहेत.
वर्धा- अमरावती जिल्ह्यात मागणी
लाल मातीपासून प्रथमच घरगुती गणपती मूर्ती तयार करण्याचा नवा ट्रेण्ड येथील कुंभार बांधवांनी आत्मसात केल्यामुळे ही पर्यावरणपूरक मूर्ती पाण्यात लवकर विरघळते. गणपती मूर्ती स्थापनापासून विसर्जनापर्यंत धार्मिक आनंदोत्सव साजरा करता येतो. त्यामुळे या लाल मातीच्या मूर्तीला वर्धा व अमरावती जिल्ह्यात मागणी वाढली आहे.
लाल मातीपासून गणपती मूर्त्या तयार करण्याचा नवा ट्रेंड यंदा आम्ही हाती घेतला आहे. सुबक व आकर्षक मूर्ती असून ही मूर्ती पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे.
- ओमेश वझे,
दिघी महल्ले
तीन पिढ्यांपासून आमच्या गावातील कुंभार बांधव मातीच्या मूर्ती तयार करतात. यंदा लाल मातीचा गणपती मूर्ती तयार केल्या. ही अभिमानाची बाब आहे.
- गोपिका चावरे,
सरपंच, दिघी महल्ले