समृद्धी प्रकल्प : ओलिताच्या जमिनीस ७५ लाख, कोरडवाहूस ५ लाखनांदगाव खंडेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना पूर्वी दीडचा गुणक असल्याने शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पावणेचार पट मिळत होता परंतु आता दोनचा गुणक लागू झाल्याने शेतजमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाच पट मिळणार आहे. महाराष्ट्र समृद्धी प्रकल्पात अधिग्रहीत होणाऱ्या शेतजमिनीचा मोबदला ओलीत जमिनीस हेक्टरी ७५ लाख तर कोरडवाहू शेतजमिनीस हेक्टरी ५० लाख रूपये मिळणार असल्याचे शासन आदेश निर्गर्मित झाले आहे. किसान स्वराजच्या सततच्या पाठपुराव्याची फलश्रृती मिळाली असल्याचे किसान स्वराज आंदोलनाचे संयोजक प्रमोद तऱ्हेकर यांनी सांगितले.नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गात शेतजमिनी अधिग्रहणसंदर्भात शेतकऱ्यांना माहिती देताना महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार बाजारभावाच्या पावणे चारपट शेत जमिनीचा मोबदला मिळणार असल्याचे सांगत होते. परंतु भूसंपादन कायद्यामधील ज्या केंद्रीय तरतूदी आहे त्यानुसार शेतजमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाचपट मिळणे गरजेचे होते. त्यासाठी किसान स्वराजच्या माध्यमातून २७ डिसेंबर २०१६ ला जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लेखी निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना पुराव्यासह कागदपत्र सादर करण्यात आले. याबाबत ७ जानेवारीला पालकमंत्र्यांसोबतसुद्धा चर्चा करण्यात आली व वारंवार महसूल विभागाकडे शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अखेर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बैठक बोलावून ९ फेब्रुवारी २०१७ च्या केंद्रीय सुधारणानुसार तत्वत: मान्यता दिली व २४ एप्रिल २०१७ ला शासन निर्णय घेऊन महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये ९ फेब्रुवारी २०१७ च्या पत्रानुसार गुणांक वाढवण्यात आला त्यामुळे आता महामार्ग प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाच पट मिळणार आहे. म्हणजेच पूर्वीच्या बाजारभावाच्या व गुणांकाच्या तुलनेत आता शेतकऱ्यांना वाढीव गुणांक व वाढीव बाजारभावामुळे एकरामागे ३ ते ५ लाखांचा अतिरिक्त लाभ मिळणार असल्याचे किसान जलस्वराज्य आंदोलनाचे संयोजक प्रमोद तऱ्हेकर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)नांदगावात शेतकऱ्यांना १२५ कोटींचा अतिरिक्त लाभशेतजमीन अधिग्रहित करताना पूर्वी बाजारभावाच्या पावणे चारपट मोबदला दिला जात होता. परंतु आता गुणांक वाढल्याने शेतजमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाचपट झाला असून नांदगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केल्या जात आहे त्यांना बाजारभावाच्या पाचपट वाढीचा लाभ मिळणार असून १२५ कोटीचा अतिरिक्त लाभ नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच समृद्धी कॅरिडोर प्रकल्पात नागपूर ते मुंबईपर्यंत महागाईत ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमीन जात आहे त्यांना दोन हजार कोटींचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
जमीन अधिग्रहणाचा पाचपट मोबदला
By admin | Published: May 01, 2017 12:17 AM