फोटो सचिन मानकर कडून मागविणे
सदर:
ग्रामीण आरोग्य यंत्रणा सलाईनवर
सचिन मानकर
दर्यापूर : तालुक्यात दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालय असून, या ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रसुती, एक्स-रे, रक्ताच्या तपासण्या इत्यादी सुविधा असूनसुद्धा गंभीर रुग्णांना अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात येते. उपजिल्हा रुग्णालयात सध्या कोविड वार्ड असल्याने सिझरीनची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. एक्स-रे मशीन आहे. परंतु त्यात योग्य प्रकारे एक्स-रे निघू शकत नाहीत. या ठिकाणी आर्थोपेडिक डॉक्टर नसल्याने अपघातातील रुग्णांना प्रायव्हेट किंवा अमरावती या ठिकाणी उपचाराकरिता जावे लागते. या ठिकाणी तज्ज्ञ सर्जन नसल्याने रुग्णांना अमरावती या ठिकाणी रेफर करावे लागते. उपजिल्हा रुग्णालयातील सरकारी सेवेतील डॉक्टर शहरात आपल्याला प्रायव्हेट दवाखान्यात उपचार देत रुग्णांची गैरसोय होत असल्याचे आरोपसुद्धा होतात. उपजिल्हा रुग्णालय येथे वर्ग १चे वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त असल्याने प्रभारी म्हणून डॉक्टर डाबेराव यांच्याकडे सूत्रे आहेत. या ठिकाणी वर्ग दोनचे वैद्यकीय अधिकारी सात पदे आहेत. वर्ग ३चे सहाय्यक अधिसेविका एक पद रिक्त आहे. अधिपरिचारिका १२ पदे मंजूर असून, एक पद रिक्त आहे. औषधनिर्माण अधिकारी तीन पदे मंजूर असून, एक पद रिक्त आहे. दंत सहाय्यक एक पद असून, तेही रिक्त आहे. कक्ष सेवकाची पाच पदे मंजूर असून, दोन पदे रिक्त आहेत. वर्ग ४ची दोन पदे मंजूर असून, तीसुद्धा रिक्त आहेत. उपजिल्हा रुग्णालय येथे कमी पाॅवरचे जनरेटर असल्याने विद्युतपुरवठा बंद झाल्यावर रुग्णांची गैरसोय होते. दर्यापूर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय असून, येवदा, चंद्रपूर, आमला व रामतीर्थ या चार गावांमध्ये पीएचसी आहेत. चारही ठिकाणी पक्क्या इमारतीचे बांधकाम आहे. या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २४ उपकेंद्रे आहेत. येवदा पीएचसीतील वडनेरगंगाई, पिंपळोद, सांगळूद, वरूड, वढाळगव्हाण ही उपकेंद्रे, तर रामतीर्थ पीएचसीअंतर्गत करतखेड, टोंगलाबाद, सामदा, सासन, भामोद, आमला पीएचसीत लेहेगाव पनोरा कळमगव्हाण थिलोरी, कळाशी, आमला, नांदेड ही उपकेंद्र आहेत. तसेच चंद्रपूर पीएचसीअंतर्गत बोराळा, चंडिकापूर, माहुली धांडे, शिंगणापूर, खल्लार, नालवाडा व महीमपूर ही उपकेंद्र आहेत. तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था असून, ४ प्राथमिक आरोग्य केंद्रात ४० खाटा, तर २४ उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी दोन अशा ४८ खाटांची व्यवस्था आहे. तालुक्यातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आठ डॉक्टर आहेत, तर २४ उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १ असे २४ डॉक्टर आहेत. चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्यसेवकाची २९ पदे मंजूर असूनसुद्धा ११ पदे रिक्त आहेत. फार्मासिस्टची ६ पदे मंजूर असून, २ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यकाचीही ८ पदे मंजूर आहेत. परंतु २ पदे रिक्तच आहेत. परिचरची २८ पदे मंजूर असून, ६ पदे रिक्त असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. ज्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र आहेत तेथील डॉक्टर व कर्मचारी बाहेरून अपडाऊन करत असल्याने योग्य प्रकारे उपचार होत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. तालुक्यात १०२ क्रमांकाच्या ४ ॲम्ब्युलन्स, १०८ क्रमांकाच्या येवदा व दर्यापूर येथे दोन ॲम्ब्युलन्स आहेत. तालुक्यात मोबाईल बसची सुविधा असून, ती महिन्यात दहा दिवस वेगवेगळ्या गावांमध्ये रुग्णांना सेवा देत असते. तालुक्याची लोकसंख्या १ लाख ७० हजारच्या जवळ असून, लसीकरण मात्र २७ हजार ३८९ नागरिकांना पहिला व दुसरा टप्पा देण्यात आला.
कोट :- ज्या ठिकाणी पदे रिक्त आहेत, त्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहे.
- डॉ. संजय पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, दर्यापूर