अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात ‘रिस्क’ घेण्यास नकार
अंजनगाव सुर्जी : विषबाधा झालेल्या महिलेला अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयातून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात, तर वृद्धाला अमरावती येथे उपचारासाठी घेऊन जाण्याचा वैद्यकीय अहवाल शनिवारी दाखल होण्याच्या काही क्षणातच देण्यात आला. अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात ही पद्धतच आता रूढ झाली आहे. जोखीम असलेल्या रुग्णांकरिता येथे काहीही उपचार नाही, केलेही जात नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
तालुक्यातील जवर्डी येथील वयोवृद्ध रुग्ण देविदास ढोक आणि सुर्जी विभागातील विषबाधा झालेली महिला या दोन्ही रुग्णांना विशेष उपचारासाठी अनुक्रमे अमरावती आणि अचलपूर येथे पाठविण्यात आले. शनिवारी रुग्ण अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले त्यावेळी एकही जबाबदार अधिकारी येथे उपस्थित नव्हता. महत्वाचे म्हणजे, बाहेरगावी पाठविण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी देण्यात आलेली १०९ क्रमांकाची रुग्णवाहिका परतण्यास पाच तासांचा अवधी लागणार होता. त्यामुळे येवदा येथून आलेल्या रुग्णवाहिकेत वृद्ध रुग्णाची व्यवस्था करण्यात आली आणि विषबाधा झालेल्या महिलेस १०२ क्रमांकाच्या प्रसूतीच्या स्थानिक कामाकरिता असलेल्या रुग्णवाहिकेतून अमरावतीला पाठविण्यात आले.
दीड लाखांवर लोकसंख्या, ४९ ग्रामपंचायती, एक नगरपालिका, सव्वाशे गावे अंतर्भूत असलेल्या अंजनगाव सुर्जी तालुक्याकरिता उभारलेल्या ग्रामीण रुग्णालयातील सुविधा फक्त प्रथमोपचारापुरत्या मर्यादित आहेत. येथील वैद्यकीय अधीक्षकपद रिक्त आहे, तर तिन्ही वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस आहेत. कर्मचाऱ्यांच्या एकूण २२ पदांना मान्यता असली तरी प्रत्यक्षात १४ कर्मचारीच कर्तव्यावर आहेत. वैद्यकीय अधीक्षकांसह प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपिक, कक्षसेवक, रुग्णवाहिका चालकासह तीन परिचारिका अशी पदे येथे अत्यावश्यक आहेत. सध्या कंत्राटी पद्धतीने काही कर्मचारी कामावर आहेत.
कोट्यवधी रुपयांची मंजुरात प्राप्त उपजिल्हा रुग्णालयाचे काम स्थानिक नगर परिषदेच्या असहकार्यामुळे आणि खासगी व्यक्तींनी आरामशीनच्या जागा रिक्त न केल्यामुळे अजूनही सुरू झाले नाही.
रुग्णालयाच्या काही चांगल्या बाबीसुद्धा आहेत. शवविच्छेदनाकरिता सुसज्ज कक्षनिर्मिती झाली आहे. नॅशनल नॉन कम्युनिकेबल डिपार्टमेंट अंतर्गत रक्तचाप व मधुमेेहाची मोफत तपासणी आणि मोफत उपचार केले जातात. औषधीही मोफत दिली जाते व याकरिता विशेष ............., एक डॉक्टर, एक स्टाफ नर्स आणि एक समुपक्षक .............................. नेमण्यात आला आहे. मृत शरीराचे काहीकाळ जतन करण्यासाठी शीतपेटी उपलब्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम (एनआरएचएम) अंतर्गत सुसज्ज प्रसूतिगृहाचे काम ग्रामीण रुग्णलयाच्या आवारात प्रगतिपथावर आहे. नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त येथे तीन इतर वैद्यकीय अधिकारी असून, प्रकल्पांतर्गत सेवा देत आहेत.