लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून हद्दपार करण्यात आलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सीकडून अद्यापही विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा डेटा प्रशासनाला मिळाला नाही. अगोदर देयके द्या, नंतरच विद्यार्थ्यांचा डेटा दिला जाईल, अशी भूमिका एजन्सीने घेतली आहे. त्यामुळे परीक्षा व मूल्यांकन विभागाचे कामकाज खोळंबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.विद्यापीठाने सन २०१६ मध्ये परीक्षेच्या आॅनलाईन एन्ड टू एन्ड कामांची जबाबदारी माइंड लॉजिक एजन्सीकडे सोपविली होती. मात्र, तीन वर्षांत या एजन्सीने एकदाही वेळेच्या आत निकाल जाहीर केला नाही. त्यामुळे परीक्षेचे कामकाज आॅनलाईन करण्यात आले असताना निकालाच्या प्रक्रियेत गती आलेली नव्हती. आॅनलाईन निकालात गोंधळ, त्रुटी आदी गंभीर प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा रोष वाढतच होता. मध्यंतरी विद्यार्थी संघटनांचे मोर्चे, आंदोलनाचा सामना विद्यापीठ प्रशासनाला करावा लागला. सिनेट सभेत माइंड लॉजिक हद्दपारीचा निर्णय झाला. त्यानुसार या एजन्सीकडून परीक्षेची आॅनलाईन कामे काढण्यात आली. मात्र, गत दोन वर्षांपासूनचे परीक्षा आणि आॅनलाईन निकालाचे विद्यापीठाकडे थकीत असलेली २.२५ कोटी रुपयांची देयके माइंड लॉजिकला दिलेले नाहीत. त्यामुळे या एजन्सीने विद्यार्थ्यांचा परीक्षेशी निगडित डेटा परीक्षा विभागाकडे दिलेला नाही. अन्य विभागांत कागदपत्रांची पूर्तता या एजन्सीने केली नाही. परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांंनी सर्वच विभागप्रमुखांकडून माइंड लॉजिककडून कागदपत्रे आल्याबाबतचा अहवाल मिळत नाही, तोपर्यंत प्रलंबित देयके अदा करू नये, असे लेखा विभागाला कळविले आहे. मात्र, काही कागदपत्रे माइंड लॉजिक एजन्सीकडे असल्याची माहिती आहे.सव्वादोन कोटींची देयके थकीतमाइंड लॉजिक एजन्सीने आॅनलाईन परीक्षा आणि निकालाबाबत गत दोन वर्षांपासूनचे सव्वा दोन कोटी रूपयांचे देयके मिळण्यासाठी लेखा विभागात बिल सादर केले. मात्र, माइंड लॉजिकडून परीक्षेची सर्वच प्रकारची कामे काढून घेतली. परंतु या एजन्सीकडे असलेला डेटा परत मिळणार नाही, तोपर्यंत देयके दिली जाणार नाही, अशी भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे. सव्वा कोटींची देयके मिळण्यासाठी या एजन्सीचे प्रबंधक विद्यापीठात येरझारा मारत आहे.सन २०१६ पासूनच्या माइंड लॉजिकडे असलेल्या उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यात आल्यात. सॉफ्ट कॉपीसुद्धा मिळाली आहे. काही ठरावीक कागदपत्रे एजन्सीकडे असून, ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ
विद्यार्थ्यांचा डेटा देण्यास ‘माइंड लॉजिक’चा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:26 AM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून हद्दपार करण्यात आलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सीकडून अद्यापही विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा डेटा प्रशासनाला मिळाला नाही. अगोदर देयके द्या, नंतरच विद्यार्थ्यांचा डेटा दिला जाईल, अशी भूमिका एजन्सीने घेतली आहे.
ठळक मुद्देदेयके रोखली : बहुतांश विभागातील कामे अपूर्णच