गजानन मोहोड
अमरावती: परतावा देण्याची टाळाटाळ करणाऱ्या पीक विमा कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले. त्यामुळे मागच्या खरीप हंगामापासून परताव्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या १३,६७२ शेतकऱ्यांना परतावा मिळण्याची शक्यता आहे.
मागच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने उभ्या पिकाचे व काढणीपश्चात पिकांचे नुकसान झालेले आहे. याबाबत पीक विमा कंपनीकडे १.२५ लाख पूर्वसूचना शेतकऱ्यांनी दाखल केल्या होत्या. यापैकी २४,८५५ अर्ज कंपनीस्तरावर नाकारण्यात आले. हे अर्ज ग्राह्य धरावे यासाठी जिल्हाधिकारी, कृषी आयुक्तालयाने दिलेले आदेश कंपनीने नाकारलेले आहेत.
पीक विमा कंपनीद्वारा आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी ७८७६८ शेतकऱ्यांना ७९.१९ कोटी तर काढणीपश्चात नुकसानीसाठी ७१५२ शेतकऱ्यांना १२.२६ कोटी, असे एकूण ८५९२० शेतकऱ्यांना ९१.४५ कोटींचा परतावा दिलेला आहे. अद्याप १३,६७२ शेतकरी परताव्याच्या प्रतीक्षेत आहे. आता पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर या शेतकऱ्यांना परतावा मिळण्याची शक्यता आहे.