मोहीम : ३१ आॅगस्टपर्यंत यादीत नोंदविता येणार नाव, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकअमरावती : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. ८ आॅक्टोबर २०१५ ते ७ नोव्हेंबर २०१५ या काळात घेतलेल्या मोहिमेत जिल्ह्यात ३१ हजार ७३८ मतदार वाढले. मतदारांना पुन्हा संधी मिळावी म्हणून ३१ आॅगस्टपर्यंत पुन्हा मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१६ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करता यावी, यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१५ दरम्यान मोहीम राबविण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारयादीत जिल्ह्यातील मतदारसंख्या ३१ हजार ७३८ ने वाढून २२ लाख ७७ हजार २८९ इतकी झाली आहे. ६ हजार ३५१ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. वगळण्यात आलेल्या नावांमध्ये मृत, स्थलांतरीत तसेच दुबार नावे असलेल्यांचा समावेश आहे. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. १ जानेवारी २०१६ ला १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनाच अर्ज करता येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. मतदारांना नावात दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांनीही अर्ज करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)
विखुरलेल्या मतदारांना नोंदणीची पुन्हा संधी
By admin | Published: April 16, 2016 12:11 AM