परिपत्रक धडकले : आदेश देण्याची प्रक्रिया सुरूअमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरात आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती मिळणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ३ एप्रिलपासून पुढील ११ महिन्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर पुनर्नियुक्ती देण्यात यावी, अशा आशयाचे परिपत्रक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक) सुनील पाटील यांच्या स्वाक्षरीने सोमवार २७ मार्च रोजी जारी करण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्नियुक्तीबाबतच्या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यभरातील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी आरोग्य विभगात विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल राज्यभरात २२ हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सन २०१२ मध्ये या अभियानाचा अवधी पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आला होता. ही मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात आल्यानंतर अभियान गुंडाळण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी, असे कळविण्यात आले होते. यामुळे या अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनात नोकरीच्या शाश्वतीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. या अभियानाला आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्यामुळे पुनर्नियुक्ती देण्यात येणार आहे. अभियानांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १एप्रिल २०१७ रोजीच्या सेवाखंड देऊन २ एप्रिल रोजीच्या शासकीय सुटी असल्यामुळे ३ एप्रिल १७ पासून पुढील अकरा महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती देण्यात यावी असे या परिपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)७९३ जणांना दिलासा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात जिल्हाभरात ७९३ अधिकारी व कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक)सुनील पाटील यांच्या स्वाक्षरीने सोमवार २७ मार्च रोजी अभियानातील सर्वानांना पुनर्नियुक्ती देण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
एनएचएम कर्मचाऱ्यांना मिळणार पुनर्नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 12:21 AM