लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : समाजातील दानशूर व्यक्तींनी नवीन मंदिर उभारणी पेक्षा आपल्या गावच्या शाळांचा जीर्णोद्धार महत्त्वाचा ठरवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. ते तोंगलाबाद येथील माजी सरपंच ओंकारराव (बापू) जाधव व इंदिराबाई जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित श्री पांडुरंग हरी आश्रम सुविधा लोकार्पण व कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते.तालुक्यातील तोंगलाबाद-सौंदळी परिसरात असणाऱ्या श्री पांडुरंग हरी आश्रमात सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा समाजप्रबोधन कार्यक्रम देखील झाला. यावेळी माजी आमदार अरुण अडसड यांनी सदिच्छा भेट दिली. याशिवाय माजी आमदार तुकाराम बिरकड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, सुनील गावंडे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, निवृत्त शिक्षक मधुकरराव अंबरते, गिरीधर बोरखडे, निळकंठ टापरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी ना. कडू यांच्या वीर बाजीप्रभू नामक विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला ५० हजारांचा धनादेश जाधव कुटुंबाने दिला. हाच धनादेश व मातोश्री इंदिराबाई कडू यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आणखी एक लाखांचा धनादेश तोंगलाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ना. कडू यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त शिक्षक सदानंद जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय जिल्हा क्रीडा अधिकारी गणेशराव जाधव यांनी दिला. संचलन प्रा. देवलाल आठवले व प्रा. निलेश जळमकर यांनी केले. आश्रम संचालक अरुण जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
सहकार्य करणाऱ्यांचा सत्कारतोंगलाबाद येथील जाधव कुुटुंबातील अरुणराव व प्रकाश हे दोन पोलीस विभागात, सदानंद जाधव हे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक, गणेशराव जाधव हे जिल्हा क्रीडा अधिकारी, तर गजाननराव शेतकरी म्हणून कार्यरत आहेत. या कुटुंबाला सहकार्य करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.