शाळेसह शिक्षकांविषयी नितांत आदर
परतवाडा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे बहिरमलगतच्या करजगावशी आपुलकीचे नाते आहे. करजगावातील ते माजी विद्यार्थी. तेथील श्री शंकरराव शिक्षण संस्था, शाळा, विद्यार्थी व शिक्षकांविषयी आजही ते नितांत आदर बाळगून आहेत.
पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण करजगावातच झाल्यामुळे तेथील मातीत त्यांचे बालपण रुजले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण शंकरराव विद्यालयात, तर विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण खेरडे विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी घेतले. आयआयटी पवई येथून अभियांत्रिकी शाखेत पीएचडी प्राप्त डॉ. दिलीप मालखेडे देशपातळीवर नेतृत्व करीत असतानाही त्यांनी करजगावशी असलेली नाळ तूटू दिली नाही. या आपल्या जन्मगावी जपलेल्या शाळेतील आठवणी त्यांनी मागे पडू दिल्या नाहीत.
आपल्या शाळेसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून फोल्ड स्कोपचा पहिला प्रकल्प नीती आयोगाकडून करजगाव येथील खेरडे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाला त्यांनी मिळवून दिला. अटल टिंकरिंग लॅबच्या उद्घाटनाकरिता अटल इनोव्हेशन मिशनचे डॉ. रामनाथन रामानन यांना त्यांनी करजगावला मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केले तसेच ते स्वतःही हजर राहिले. शंकरराव शिक्षण संस्थेच्या चारही शाळांना अटल टिंकरिंग लॅब मिळविण्यात त्यांचा प्रमुख वाटा आहे.
श्री शंकरराव शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवात तब्बल पाच दिवस डॉ. मालखेडे यांनी सहभाग घेतला होता. संस्थेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. करजगावच्या मातीशी आपुलकीचे नाते जपणाऱ्या डॉ. मालखेडे यांनी बहिरमच्या यात्रेतील आठवणीही जपून ठेवल्या आहेत. यामुळेच त्यांच्या नियुक्तीमुळे शालेय मित्रांसह शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे.