अमरावती : आर्द्राचे अखेरच्या चरणातील दमदार पावसाने खरिपाला संजीवनी मिळाली आहे. तीन आठवड्यांपासून पावसाची ओढ असल्याने थबकलेल्या तीन लाख हेक्टरमधील पेरण्यांना आता गती मिळणार आहे. सार्वत्रिक पावसामुळे कोवळी पिकांना संजीवनी मिळाली आहे.
यंदाच्या खरिपात ८ जूनला मृग नक्षत्रास सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात पाऊस १८ जूनला पडला. त्यानंतरच्या आर्द्रा नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी सार्वत्रिक पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये जिल्ह्यात सरासरी २५.७ मिमी पावसाची नोंद झाली व दुसऱ्याही दिवशी काही तालुक्यात पावसाची नोंद झाल्याने पेरणी झालेल्या चार लाख हेक्टरमधील पिके तरारली आहेत.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसाने तब्बल २३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये दहा मंडळात तर १०० मि.मी.पेक्षा पाऊस झाल्याने ढगफुटीची स्थिती ओढावली होती. या भागात एक ते दोन दिवसांपूर्वी झालेल्या पेरण्या दडपण्याची भीती निर्माण झालेली आहे, तर पिकात खांडण्या पडणार असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.
आतापर्यंत चार लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी
सोमवारपर्यंत ३ लाख ९९ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रामध्ये पेरण्या आटोपल्या. यामध्ये धारणी तालुक्यात १५ हजार ३५४ हेक्टर, चिखलदरा १२ हजार ७४२, अमरावती २६ हजार ६१३, भातकुली १९ हजार ८१७, नांदगाव खंडेश्वर २६ हजार ३३९, चांदूर रेल्वे २४ हजार ४२४, तिवसा ३४ हजार ९३५, मोर्शी ४२ हजार ८११, वरूड १७ हजार ९३५, दर्यापूर ५२ हजार ४२५, अंजनगाव सुर्जी ३१ हजार ४४४, अचलपूर २४ हजार ५८५, चांदूर बाजार २९ हजार ९२६, व धामणगाव रेल्वे तालुक्यात ३९ हजार ६३६ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.