आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात रखडलेले २४ प्रकल्प शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ प्रकल्प अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक १,६०१ कोटींचा निधी केंद्र शासन नाबार्डच्या माध्यमातून कर्जस्वरूपात, तर उर्वरित २५ टक्के निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून २९ हजार ६१५ हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ होईल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.राज्यात अर्धवट रखडलेले १०४ प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी ६,५९१ कोटी १८ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये २५ टक्के निधी केंद्र शासन देणार आहे. या योजनेत विदर्भातील ८१ प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी २,८१३ कोटी १२ लाखांचा निधी आवश्यक आहे. या योजनेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. केंद्रीय जल आयोग व नीती आयोगाची मान्यता मोठ्या व मध्यम प्रकल्पांना आवश्यक आहे आणि ती लवकरच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेमध्ये पर्यावरण व अन्य वैज्ञानिक मान्यता असलेल्या प्रकल्पांचा समावेश करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून हे सर्व प्रकल्प मार्गी लागतील व शेतकरी सुजलाम्, सुफलाम् होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विदर्भात अर्धवट स्थितीतील ८१ प्रकल्पांसाठी ३,८३६ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. या निधीच्या २५ टक्के म्हणजेच ९५९ कोटींचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे, तर उर्वरित ७५ टक्के निधी केंद्र शासन नाबार्डच्या माध्यमातून कर्जाऊ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेला आ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जयंत डेहणकर आदी उपस्थित होते.योजना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठीशेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळी जिल्ह्यांसाठीच प्रामुख्याने बळीराजा नवसंजीवनी योजना आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पाची रखडलेली कामे या योजनेच्या माध्यमातून पूर्णत्वास जाऊन सिंचनाचा अनुशेष दूर होणार आहे. गेल्या १० वर्षांमध्ये जिल्ह्यात एकाही प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळेच सिंचनाचा अनुशेष व शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली, ही बाब निश्चीतच भूषणावह नाही, असे आ. सुनील देशमुख यांनी सांगितले.या प्रकल्पांचा समावेशजिल्ह्यात निधीअभावी अर्धवट स्थितीत बोर्डी नाला, गडगा, पंढरी, पेढी बॅरेज, वासनी अशी पाच मुख्य, तर आमपाटी, बागलिंगा, भेमडी, बोेर नदी, चांदी नदी, चंद्रभागा बॅरेज, करजगाव, लोअर चारघड, लोअर साखळी, पाक नदी, पाटिया, रायगड, सामदा, सोनगाव साखळी, टिमटाला, टाकळी कलान, वाघाडी व झटामझिरी या लघुप्रकल्पांचा समावेश आहे.
रखडलेल्या २४ प्रकल्पांना ‘बळीराजा जलसंजीवनी’चे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:22 AM
जिल्ह्यात रखडलेले २४ प्रकल्प शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ प्रकल्प अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देपालकमंत्री : १,६०१ कोटींचा निधी आवश्यक, २५ टक्के केंद्राचा हिस्सा