अमरावती : मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आणि यादीतील चुका दूर करण्यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नावनोंदणीसाठी आता आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. १५ डिसेंबरपर्यत दावे व हरकती मागविण्यात आल्या आहेत.
अंतिम मतदार यादी १५ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मतदान प्रक्रियेपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वत:हून कुणाचेच नाव मतदार यादीतून डीलीट केले नाही. मात्र, आता मतदार यादी अचूक करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. मतदार याद्यांमधून मृतांची नावे काढण्यात येणार आहेत. १७ नोव्हेंबरपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
बॉक्स
जानेवारीला अंतिम यादी
१५ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. ५ जानेवारीला दावे आणि हरकती निकाली काढण्यात येतील. १४ जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी आणि १५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
बॉक्स
ऑनलाइन अर्ज शक्य
लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी नव्या मतदारांना सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी १ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या मतदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी निवडणूक विभागाने दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे