माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, जून २०२१, प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी असे असणार नमूद
अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याद्वारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या १६ जुलै रोजी ऑनलाईन निकाल जाहीर झाला. आता अकरावी व अन्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र, यंदा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण जून २०२१ असा दाखल्यावर शेरा राहणार असून, प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणी अशी नोंद असेल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. त्यामुळे दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा काय असेल, याबाबत गत काही दिवसांपासून मुख्याध्यापकांसह विद्यार्थी, पालकांचा संभ्रम कायम होता. परंतु, राज्य शिक्षण मंडळाने दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर ‘कोरोना’, ‘कोविड’ असा कोणताही शेरा असणार नाही, ही बाब स्पष्ट केली आहे. अमरावती जिल्ह्यात ७४७ माध्यमिक शाळा आहेत. दहावीची ४० हजार ६७८ विद्यार्थिसंख्या होती. त्यापैकी ४० हजार ६७७ विद्यार्थी प्रवेशित होते. ४० हजार ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता दहावीतील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा ठरल्याने मुख्याध्यापकांसह विद्यार्थी, पालकांचा संभ्रम दूर झाला आहे.
-------------------
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : ७४७
दहावीतील एकूण विद्यार्थी : ४०६७७
पास झालेले विद्यार्थी : ४०५३१
मुले : २१४१९
मुली : १९११२
-------------------
मुख्याध्यापक म्हणतात...
‘दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर कोणता शेरा असेल, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निकालाबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार निकाल जाहीर झाला आहे. आता सीईटी परीक्षेतून विद्यार्थी पुढे प्रवेशित होणार आहेत.
- शरद तिरमारे, मुख्याध्यापक, दाभा
--------------
यंदा दाखल्यावर वेगळा शेरा राहणार नाही. गुणपत्रिका अद्याप यायच्या आहेत. बोर्डाने तसे काही निर्देशही दिले नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल. किंबहुना शिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.
- विलास ढवळे, मुख्याध्यापक, सातरगाव
--------------------
पालक काय म्हणतात..
दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी पुन्हा सीईटी परीक्षांच्या सामोरे मुलांना जावे लागणार आहे. वर्षभर ऑनलाईन शिक्षणाचे काहीच साध्य झाले नाही. परीक्षाविना विद्यार्थी उत्तीर्ण झाले खरी, पण पुढील प्रवेशाच्या वेळी कस लागणार आहे.
- प्रीती डोंगरे, पालक
----------
कोरोनामुळे शिक्षणाचे तीनतेरा वाजले. किमान दहावीच्या परीक्षा होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. अभ्यास केला, तो वाया गेला. आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देण्यासाठी पुन्हा विद्यार्थ्यांना तयारी करावी लागणार आहे.
- सचिन पवार, पालक