सर्वेक्षणाला प्रारंभ : ट्रॅफिक स्टेट्स रिपोर्ट येणार अमरावती : अपूर्वा देऊळगांवकर या तरुणीच्या अपघाती मृत्युनंतर पोलीस प्रशासनासह अन्य विभागांनाही खडबडून जाग आली आहे. शहरातील वाहतुकीचा अभ्यास करुन उपाययोजना सुचविण्याच्या हेतुने मंगळवारपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली. पोलीस उपायुक्त नितिन पवार यांच्या नेतृत्वात या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली. त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, एसटी आणि महापालिकेचे अधिकारी सहभागी झालेत. समन्वय समितीच्या सदस्यांसह नगरसेवकांनीही वाहतुकीच्या नियमनासंदर्भात सूचना दिल्यात. पोलीस उपायुक्त नितिन पवार यांनी प्रथम शहर वाहतूक शाखेच्या इर्विन चौक कार्यालयात नगरसेवक व समन्वयक समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी महापालिका अतिक्रमण विभाग पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, सहप्रादेशिक परिवहन अधिकारी एम.बी.नेवासकर यांच्यासह एसटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सहभागी झाले. यात उपस्थितांनी वाहतुकीसंदर्भात चर्चा केली. इर्विन चौकातून सर्वेक्षणाला सुरूवात इर्विन चौकातून सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आली. इर्विन चौकात उभी राहणारी वाहने कुठे वळविता येतील, आॅटोरिक्षा पार्किंग, अॅम्ब्युलन्स पार्किंगबाबतही चर्चा झाली. नगरसेवक दिनेश बुब, मिलिद बांबल, राजू मसराम, संजय मालपे यांनी पोलीस उपायुक्त पवार यांना सूचना केल्यात. वाहने हटविली डीसीपी नीतीन पवार हे सर्वेक्षणासाठी अन्य अधिकारी व नागरिकांसह बाहेर पडल्याचे कळताच कॉटन मार्केट संकुलाजवळ राजरोसपणे उभी राहणारी काही वाहने तात्पुरती हटविण्यात आली. पवार आणि चमू गेल्यानंतर या भागातील अतिक्रमण जैसे थे झाले. (प्रतिनिधी)मालवीय चौकातील अतिक्रमणाने अवाक् मालवीय चौकातील गॅरेजसमोर लागलेले अतिक्रमण पाडून पवार व अन्य अधिकारी अवाक झाले. इर्विन ते चित्राचौकापर्यंत रस्त्यावर पार्किंग व अतिक्रमण पवार यांच्या नजरेतून सुटू शकले नाही. कॉटन मार्केट संकुलासमोर लागणारी चारचाकी वाहने येथेच का लगतात, असा सवालही यावेळी उपस्थित झाला.पार्किंग, नो-पार्किंग आणि हॉकर्स झोनची पाहणी ट्रॅफिक स्टेटस रिपोर्टसाठी पार्किंग, नो-पार्किंग आणि प्रस्तावित हॉकर्स झोनची पाहणी करण्यात आली. हॉकर्स झोन कार्यान्वित झाल्यास फेरीवाल्यांना अधिकृत जागा मिळेल व अतिक्रमणातून शहराची मुक्तता होईल, असे निरीक्षणही सर्वेक्षणादरम्यान निरीक्षण नोंदविण्यात आले. प्रभारी एसीपी बळीराम डाखोरे, वाहतूक निरीक्षक प्रमेश आत्राम, निलिमा आरज, परिवहन अधिकारी रवींद्र अनवाने, विभागीय वाहतूक अधिकारी ए.बी. सिया, साबांविचे अतिरिक्त अभियंता आर. आर. तिवारी, पि.यू. उमाळे, महापालिका सहाय्यक अभियंता एस.एम. टोपरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अनियंत्रित वाहतुकीवर उपाययोजनांचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2016 11:58 PM