जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; स्वाभिमानी पक्षांची मागणी
अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प एम. एस. रेड्डी व उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी शनिवारी स्वाभिमानी पक्षाच्यावतीने पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचक कंटाळून बुधवारी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेला जबाबदार असलेले उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे सतत दीपाली चव्हाण त्रास देत होते. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतरही मुख्य वनसंरक्षक एम.एस.रेड्डी यांनी कुठलीही कारवाई न करता शिवकुमारची पाठराखण केल्याचे दीपालीने मृत्यूपूर्व लिहिलेल्या सुसाईड नोट नमूद केले आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहाेड, अमित अढाऊ, रवि पडोळे, मंगेश फाटे, संजय जाधव, नंदकिशोर शेरे, शुभम वानखडे, अंकुश कडू, शुभम पाटील आदींनी निवेदनाव्दारे केली आहे.