अमरावती : वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या यादीत कोरोनाचा समावेश करताना एसपीओ-२ (ऑक्सिजन पातळी) ९५ च्या खाली असण्याची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे या वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळविताना अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर शासन निर्णयातील ही अट वगळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे केली आहे.
ऑक्सिजनची आवश्यकता वाढली आहे. काही जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे. शरीरातील ऑक्सिजन कमी झाले म्हणून मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात अनेक शिक्षकांना जीव गमावावा लागला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या यादीत कोरोनाचा समावेश करण्यात आला. यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.
राज्य सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आकस्मिक व गंभीर आजाराकरिता खासगी रुग्णालयात होणाऱ्या उपचाराकरिता होणाऱ्या खर्चाची वैद्यकीय प्रतिपूर्ती शासनाकडून दिली जाते. ज्या आजाराकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची तरतूद आहे. त्यात मार्च २००५ चे शासन निर्णयानुसार २७ गंभीर आजार व ५ आकस्मिक आजाराचा समावेश आहे. त्यात फुफ्फुसाशी संबंधित आजाराचा उल्लेख असला तरी कोरोना असा स्पष्ट उल्लेख नसल्याने कोरोनाने बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांना त्याबाबतची वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणार नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या आजाराच्या यादीत कोरोनाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी विविध शिक्षक व अन्य कर्मचारी संघटनांनी शासनाकडे केली होती. राज्य शासनाकडून याची दखल घेत वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या यादीत कोरोनाचा समावेश केल्याबाबतचा शासननिर्णय नुकताच निर्गमित केला आहे. यातील ती अट कमी करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुल राऊल, संभाजी रेवाळे, राजेश सावरकर, मनीष काळे, सरिता काठोळे, योगिता जिरापुरे, सुषमा वानखडे, भावना ठाकरे आदींनी केली आहे.