बसेसच्या स्वच्छतेबाबतही महामंडळ बेफिकीर...
अमरावती : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. मात्र, कोरोनाकाळात अनेक महिने बसेस आगारात उभ्या राहिल्याने अनेक गाड्यांची दुरवस्था झाली. नियमात शिथिलता मिळताच एसटी बसेसही पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. असे असताना एसटी बसच्या तिकीट दरातही खासगी टॅव्हल्सपेक्षा अधिक वाढ झाली आहे. मात्र, प्रवाशांच्या सुविधेसाठी पुरविण्यात येणाऱ्या आशियाड आणि शिवशाही बसमधील सुविधा सर्वसाधारण बसपेक्षाही बोगस असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक बसेस मध्ये प्रवाशांच्या आसनासमोर थुंकण्याचे अस्वच्छेने कहर झाला आहे.
राज्य परिवहन विभागाकडून सर्वसाधारण, आशियाड व शिवशाही बसेस चालविण्यात येतात. यामध्ये सर्वसाधारण,लांब पल्ला,मध्यम पल्ला व शेटल फेऱ्या आदीचा समावेश आहे.अमरावती विभागाकडे जवळपास ३६८ बसेस आहेत. त्यापैकी २५० हून अधिक बसेस प्रवाशी वाहतुक करत आहेत.
खासगी वाहतूक सेवेला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून बसेसमध्ये सातत्याने नवनवीन बदल केले जातात. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशा प्रयत्नांमुळेच आज घडीला एसटी सेवा टिकून आहे. प्रवाशांकडूनाही या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु प्रवाशांना सुविधा देताना महामंडळातर्फे लक्ष दिले जात नाही. परिणामी आजही काही बसचे पत्रे खराब झाल्याचे दिसून येत आहे. सोबतच बसमधील सीटही फाटली असून, अनेक बसमध्ये प्रवाशाच्या बाजूने पान व गुटख्याच्या पिचकाऱ्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. अशा ठिकाणी बसून प्रवाशांना नाईलाजाने प्रवास करावा लागत असल्याने एसटी महामंडळाबाबत प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बॉक्स
एसटीची कसरतीचा प्रवास
एसटीचा प्रवास सुरक्षित समजून प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, अनेक आसने धुळीने माखलेली आहेत. ती रुमालाने स्वच्छ करून बसावे लागते. प्रवाशांच्या आसनासमोरच पान, खऱ्याच्या थुंकीचे डाग दिसून येतात. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
- अतुल कावरे,
प्रवासी
बॉक्स
कोट
कोरोना काळात दीड महिने बसेस बंद होते नादुरुस्त बसेसची दुरुस्ती केली आहे. बसमध्ये थांबणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. याबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात येतील.
- श्रीकांत गभने,
विभाग नियंत्रक
बॉक्स
वायफाय सेवा केव्हाचीच बंद
राज्य परिवहन महामंडळाने गत काही वर्षापूर्वी प्रवाशांकरीता वायफाय सेवा सुरू केली होती. मात्र, आता सर्वसाधारण, आशियाड, शिवशाही बसमध्ये वायफाय सुविधानाही बंद केली आहे. याशिवाय प्रवाशांना आसनासमोर पाणी बॉटल, वर्तमानपत्रे ठेवण्यासाठी सुविधाही धूसर झाली आहे.
बॉक्स
नागपूर ते अमरावती प्रवास भाडे
सर्वसाधारण बस -१९५ रुपये
शिवशाही बस-२९० रुपये
आशियाड-२६५ रुपये