अमरावती : रेशनवरील साखरेचे जुलै महिन्यापासून वितरण होत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात साखर पोचलेली नाही. त्यामुळे बेपत्ता झालेल्या साखरेला पुन्हा पाय फुटले काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सर्वसामान्यांना धान्य दुकानावर साखर मिळत नसल्याचे चित्र आहे.गेल्या दीड वर्षांपासून वाहतूकदार मिळत नसल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत साखर मिळत नव्हती. एरवीही सणासुदीच्या दिवसांमध्ये रेशनवरील साखरेची आठवण सर्वसामान्यांना होत होती. मात्र साखर उचलणारे व पुरविणाऱ्यांची असमर्थता दर्शविल्याने साखरेचे वितरण होऊ शकले नव्हते. सुरुवातीला ई-निविदा पद्धत अवलंबण्यात आली. पण या निविदा प्रक्रियेकडे सर्वांनी पाठ फिरवली.त्यानंतर कारखान्यांकडून साखर खरेदी करून ती पुरविण्याची जबाबदारी राज्य साखर संघाने घेतली. पण खरेदीच्या किमतीत एकमत न झाल्यामुळे राज्य साखर संघानेही साखर उपलब्ध करण्यास असमर्थता दर्शविली. या सर्व प्रक्रियेत गेल्या दोन वर्षांपासून रेशनवरील साखर बेपत्ता झाली होती. दरम्यानच्या काळात एनसीडीईएक्स स्पॉट एक्सचेंज या कंपनीने ई-लिलाव पद्धतीने साखर खरेदी करून ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास समर्थता दर्शविली. त्यानुसार शासनाने या कंपनीला सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर साखर पुरविण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जुलै ते नोव्हेंबर २०१४ या पाच महिन्यात कंपनीने साखर पुरविण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जुलै ते नोव्हेंबर २०१४ या पाच महिन्यात कंपनीने साखर खरेदी करून पुरवठा केला. त्यांनी वापरलेली प्रक्रिया पारदर्शक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे शासनाने आता सर्व प्रक्रिया या कंपनीच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात रेशनवरील साखर उपलब्ध होत असल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात ही साखर दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना मिळत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. साखर कोणालाही मिळो पण रेशनवरील साखर वितरण पुन्हा सुरू झाल्याने ग्राहकात आनंदाचे वातावरण असायला हवे; पण प्रत्यक्षात रेशन दुकानात साखरच उपलब्ध होत नाही. त्यामुळे अन्न सुरक्षा अभियानातील निकषास पात्र ठरलेले व एपीएलधारकही रेशनवरील स्वस्तातील साखरेच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
रेशनवरील साखरेला पुन्हा फुटले पाय
By admin | Published: January 20, 2015 10:30 PM