अमरावती - आंध्र प्रदेश, तेलंगणा व गुजरातच्या काही भागात सन २०१५-१६ मध्ये गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला. महाराष्ट्रात या किडींचा फारसा प्रादुर्भाव आढळलेला नव्हता. मात्र, हा महाराष्ट्रात किडीचा उद्रेक होण्याचा धोक्याचा इशारा होता. दुर्दैवाने याकडे फारशा गांभीर्याने पाहण्यात आले नाही. आवश्यक उपाययोजनादेखील करण्यात आलेल्या नसल्याने गुलाबी बोंडअळीचे संकट उद्भवल्याचा गौप्यस्फोट एसएबीसी व आयएसबीआयच्या अहवालात करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रात २००२ मध्ये बीटी बियाणे दाखल झाल्यानंतर सर्व प्रकारच्या बोंडअळीच्या प्रादुर्भावात लक्षणीय घट झाली. या बियाण्यात बोंडअळीपासूनचे अंगभूत संरक्षण पिकाला देऊ केले होते. सुरूवातीला ‘क्राय वन एसी’ हे बियाणे वापरण्यात आले होते. मात्र, एकाच बियाण्याचा वापर कायम राहिल्यास बोंडअळी स्वत:त प्रतिकारक्षमता विकसित करून पुन्हा प्रादुर्भाव करू शकतात, हे लक्षात आल्यानंतर ‘क्राय वन एसी व क्राय वन टूबी’ या दोन जनुकांचा वापर असलेल्या बोलगार्ड-२ या तंत्रज्ञानाला मान्यता देण्यात आली. या वाणाला शेतकºयांनी उदंड प्रतिसाद दिला. सन २०१०-११ पासून राज्यात कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी ९० ते ९२ टक्के क्षेत्रात बीटी कपाशीची लागवड होऊ लागली. यामध्ये भर म्हणजे, सर्वच प्रकारच्या नोंदणीकृत १००० पेक्षा जास्त बीटी वाणांचे विक्रीस परवानगी देण्यात आली. मात्र, पर्यायी भक्ष पिकांच्या (रेफ्युजी) मूलभूत अटीचे सरसकट उल्लंघन झाले. परिणामी गुलाबी बोंडअळीची प्रतिरोधक क्षमता हळूहळू वाढत गेली. कमी किंवा मध्यम कालावधीच्या वाणांची लागवड न करणे तसेच हंगाम जास्त न लांबविता वेळेतच संपविणे आदी उपाययोजना झाल्याच नसल्याने आताचे संकट ओढावले असल्याचे आयएसबीआय, मुंबई ( इंडीयन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रूव्हमेंट) व एसएबीसी, नवी दिल्ली (साऊथ एशिया बायोटक्नॉलॉजी सेंटर) च्या अहवालात नमूद आहे.
बोंडअळीत प्रतिकारक्षमता विकसित होण्याची कारणे- बोंडअळीवर प्रभावी असलेल्या ‘पायरेथ्राइट’ घटक असलेल्या कीटकनाशकांची शिफारशीच्या मात्रेहून कैकपटीने अधिक फवारणी.- कपाशीच्या क्षेत्रात क्वचितच फेरबदल. वर्षानुवर्षे तीच पीक असल्यानेच किडीचा कायमस्वरूपी मुक्काम.- लागवडीसाठी परवानगी नसलेल्या अनधिकृत बीटी व तणनाशकाला सहनशील बियाण्यांचा वाढता वापर.- दीर्घ कालावधीचे संकरित वाण बोंडाळीला स्थिरावण्यास मदत व खाद्य मिळून अळीचा जीवनक्रम खंडित होत नाही.- १२० दिवसांनतर बीटी बियांण्यांच्या जनुकीय शक्तीत कमी येत असल्यानेच पीक किडीला बळी पडते.